- वैभव गायकरपनवेल : कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी पार पडत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये चार महसुली गावे व सात आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. कर्नाळा अभयारण्यामुळे या ग्रामपंचायतीला वेगळे महत्त्व असून, ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण आदिवासी वाडीला देवदर्शनाच्या नावाने स्थलांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत खैराटवाडी ही आदिवासी वाडी असून, येथील लोकसंख्या २०० च्या आसपास आहे. तर वाडीत ५६ मतदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आदिवासी वाडीला गेल्या तीन दिवसांपूर्वी दोन बसमध्ये भरून देवदर्शनाला नेण्याचा घाट काही राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी घातला. याबाबतचे वृत्त पसरू नये म्हणून खबरदारी घेत वाडीतील मतदारांना सोबत घेऊन न जाता, त्यांच्या कुटुंबीयांना देवदर्शन घडविले जात आहे. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तीच सध्या गावात दिसत आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना कोणतेही आमिष दाखविणे अथवा त्यांच्याकडून मत विकत घेण्याचा प्रयत्न करणे हा आचारसंहितेचा भंग मानला जातो. मात्र, अशा प्रकारामुळेही आचारसंहितेची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तीन दिवसांपासून बाहेर असलेले आदिवासी बांधव थेट रविवारी म्हणजे चौथ्या दिवशी मतदान करण्यासाठी गावात दाखल होणार आहेत.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खैराटवाडी आदिवासी बांधवांना देवदर्शन घडविण्याच्या प्रकाराची चर्चा संपूर्ण पंचक्र ोशीत आहे, तर राजकीय पक्षाने या ठिकाणी दहशत माजवल्याने कोणीही याबाबत बोलण्यास तयार नाही.संबंधित प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी माहिती घेतली जाईल आणि तथ्य असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या अॅडव्होकेट सुरेखा दळवी यांनी दिली.
संपूर्ण आदिवासी वाडी गेली देवदर्शनाला; आज मतदानासाठी परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 5:04 AM