रोह्यात पुराचे पाणी तब्बल ४८ तास जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:39 AM2019-08-05T00:39:44+5:302019-08-05T00:39:52+5:30
कुंडलिकेच्या पातळीत वाढ; अतिक्रमणामुळे साचतेय पाणी
रोहा : कुंडलिका नदीला पूर येऊन रोह्यात शुक्रवारी रात्री निर्माण झालेली पूरपरिस्थिती रविवारीही कायम राहिली आहे. शनिवारी रात्री केवळ चार तास नदीची पाणी पातळी ओसरली होती, मात्र पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊन पूरपरिस्थिती जैसे थे राहिली आहे. निसर्गाच्या प्रकोपासह मानवी अतिक्रमणाचा फटका रोहेकरांना बसला असून पुराचे पाणी तब्बल ४८ तास राहिले आहे, तर रोठ गावात भरलेले पुराचे पाणी गेले ३ दिवस जैसे थे आहे. पाण्याचा विसर्ग होत नसल्याने रोहेकर मात्र चांगलेच चिंतेत आहेत.
गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी रात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली, पुराचे पाणी रोहा अष्टमी शहरासह वरसे, रोठ आणि धाटाव गावांत शिरले. निसर्गाच्या प्रकोप, लहरी वृत्ती बरोबरच नदी पात्रात झालेल्या मानवी अतिक्रमणाचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव येत आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी अनुक्रमे २९ आणि ४८ तास राहिलेली पूरपरिस्थितीमुळे रोहेकरांना चांगलाच फटका बसला.
अष्टमीत पाणी भरल्याने रोहा अष्टमी शहरासह नदीच्या दोन्ही बाजूकडील संपर्क खंडित राहिला. पर्जन्यवृष्टीने पूल ओसंडून गेले, वस्तींमधून पाणी शिरले मात्र पाण्याचा निचरा नेहमीप्रमाणेच झाला नाही. यंदा वाढलेली पाणी पातळी दीर्घकाळ राहिली आहे. नदीचा प्रवाह मयार्दीत होण्या मागील कारणांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेणे जरूरी आहे. गेल्या नऊ दिवसात दोन तीन वेळा या प्रसंगाना सामोरे जावे लागले आहे.
नदी संवर्धनात मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे, या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट लोणेरा विद्यापीठाकडून करून घ्यावे अशी आमची मागणी आहे. तसे आॅडिट करण्यास हरकत नाही असे मुख्याधिकारी रोहा यांनी लेखी दिले, मात्र पुढे काहीच केले नाही. हे आॅडिट या संस्थेकडून करून घेऊन त्याबाबतचा अहवाल नागरिकांपुढे खुला करावा.
- नितीन परब, अध्यक्ष सिटीझंस फोरम, रोहा
रोह्यामध्ये २९५.०० मि.मी. पाऊस पडून सुध्दा बाजारपेठमध्ये पाणी आलेल नाही, काही भागात जे पाणी आलय ते सखल भाग असल्याने आलेले आहे. कुंडलिका नदीच्या झालेल्या संवर्धन कामामुळेच सर्व नागरिक मोकळा श्वास घेत आहेत.
- महेंद्र दिवेकर, उपनगराध्यक्ष, रोहा नगरपरिषद
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थीती फार तर चार ते आठ तास असायची, परंतु यावर्षी २९ आणि ४८ तास पूरपरिस्थिती राहिली, नदी पात्रात होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे पाण्याचा विसर्ग होत नाही, पाणी मागे फिरून लागतच्या गावात शिरत आहे.
- दिलीप वडके, संस्थापक कुंडलिका नदी संघर्ष समिती