मोहोपाडा : ग्रामपंचायत सूचना व तक्र ार निवारण व्हॉट्सअॅप नंबर प्रसिध्द करणे, ग्रामपंचायत पंधरा टक्के निधीतून लाभार्थींना साहित्याचे वाटप करणे, घंटागाडी व ट्रॅक्टरट्रॉलीचे उद्घाटन करणे आदी विकासकामांचे उद्घाटन आ.मनोहर भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्हॉट्सअॅपव्दारे नागरिकांच्या सूचना व तक्र ार निवारण करणारी मोहोपाडा ग्रामपंचायत ही रायगडमधील पहिली ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीने नागरिकांच्या समस्या व तक्र ार निवारण करण्यासाठी व्हॉट्सअॅपचे माध्यम उपलब्ध करून ग्रामपंचायतीने कौतुकास्पद काम केले असल्याचे गौरवोद्गार आमदार मनोहर भोईर यांनी काढले. खालापूर तालुक्यातील मोहोपाडा ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे. वाढता विस्तार पाहता परिसरातील समस्या तसेच ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढली असून या समस्या निवारण करण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सअॅप सोशल मीडियाचा चांगला फायदा होवून परिसरातील समस्या सुटण्यास मदत होईल. मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देईन तसेच भेडसावणारी पाणी समस्याही लवकरच दूर करू असे आश्वासन यावेळी आमदार मनोहर भोईर यांनी बोलताना दिले. यावेळी सरपंच शशिकांत मुकादम यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे. याकरिता ग्रामपंचायतीचा व्हॉट्सअॅप नंबर ९०७५३४५३४५ हा असून नागरिकांनी या क्र मांकावर आपल्या समस्या मांडाव्यात, त्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे आवाहन सरपंच शशिकांत मुकादम यांनी केले. यावेळी सरपंच मुकादम यांनी शासनाकडून घनकचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आ.मनोहर भोईर यांच्याकडे केली.जि.प.सदस्या उमा मुंढे यांनी येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन टॅब मिळावा यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती श्याम साळवी, उपसरपंच सद्गुणा पाटील, सुरेश म्हात्रे, नथुराम भोईर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
तक्रारी निवारणासाठी व्हॉट्सअॅप उत्तम
By admin | Published: November 30, 2015 2:24 AM