भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप का घेतला नाही- तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:20 AM2019-04-07T00:20:03+5:302019-04-07T00:20:33+5:30
३० वर्षांत काय केले आहे, याची माहिती देण्यासाठी आपण बोलवाल, त्या ठिकाणी येण्याची माझी तयारी आहे.
अलिबाग : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुरुंगात टाकण्याची भाषा करीत असताना, माझ्या उमेदवारी अर्जावर छाननीच्या वेळी कोणतेच आक्षेप गीते यांनी का घेतले नाहीत? असा प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व अन्य मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी रात्री आयोजित आघाडीच्या मेळाव्यात उपस्थित केला.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबागमधील काँग्रेस भवनच्या मैदानावर आयोजित मेळाव्यास रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप, काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, माजी जिल्हा अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, काँग्रेसचे प्रचार प्रमुख राजेंद्र ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हा मुख्य संघटक ऋ षीकांत भगत, जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ, रायगड जिल्हा चिटणीस जगदीश घरत, अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ, शहराध्यक्ष राजन तांडेल, अलिबाग तालुका युवक अध्यक्ष मनोज शिर्के, काँग्रेसचे युवा नेते अॅड. प्रवीण ठाकूर, अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मगर आदीसह आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, ३० वर्षांत काय केले आहे, याची माहिती देण्यासाठी आपण बोलवाल, त्या ठिकाणी येण्याची माझी तयारी आहे. राजकीय जीवनात काम करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मदत केली आहे. मात्र, आपल्या कार्य अहवालात कधीही कोणाला काय मदत केली, याबाबत लिहिलेले नाही. मात्र, शिवसेनेचे अनंत गीते यांनी एका व्यक्तीला केलेल्या मदतीबाबत त्यांचे नाव, पत्ता, केलेली मदत याची माहिती कार्य अहवालात दिली.
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आ. माणिक जगताप म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली युती सरकारने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. नोकरीचे आमिष दाखवून मते मिळविण्याचे काम केले; परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे आश्वासन यांनी पूर्ण केले नाही. नोटाबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचे जगताप यांनी अखेरीस सांगितले.