- विजय मांडे
कर्जत : माथेरान शहराला नेरूळ येथून पंपिंग करून पाणी पुरवले जाते. मात्र, येथील पाणी प्रचंड महाग आहे. घरगुती वापरासाठी किमान दर २६ रुपये व कमाल दर ५३ रुपये प्रति एक हजार लिटर इतका आकारला जात आहे. यामुळे येथील नागरिकांसह व्यावसायिकांना पाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. कमाईचा निम्मा भाग पाण्यावर खर्च होत असल्याची व्यथा येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
येथील शारलोट लेक व सिम्पसन टॅंक या दोन तलावांची क्षमता एक टीएम सी इतकी वाढवावी किंवा शासनाने माथेरानसाठी प्राधिकरणाला अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. माथेरानकरांना पाण्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. पाणी दर कमी करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठकीचे आयोजन करणार, असे आ. महेंद्र थोरवे यांनी सांगितले.
पाण्याचे दर अधिक का? माथेरानला शारलोट लेक या एका तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावाची क्षमता केवळ १५० एमएलडी इतकी असल्याने पाणी पुरत नाही. त्यामुळे १९९० च्या दशकात राज्य सरकारने नेरळ येथून उल्हास नदीचे पाणी पंप करण्याची स्कीम राबवली आहे. नेरळहून अडीच हजार फूट उंच पाणी तीन स्टेजमध्ये पंप करावे लागते. यासाठी लागणाऱ्या वीजेचे बिल हे एक कोटीच्या घरात जाते. त्यामुळे पाणी पट्टीच्या रूपाने हा खर्च वसूल केला जात आहे.
कमाईचा निम्मा भाग पाण्याचे बिल देण्यातच जातो. सातत्याने वाढणाऱ्या पाणी दरांमुळे येथील व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. ज्या पद्धतीने शेती उद्योगाला सरकार आर्थिक मदत देत असते, तशीच मदत पर्यटनाला देण्याची गरज आहे. - शैलेश भोसले, लॉजिंग व्यावसायिक
मुंबई महानगर पालिकादेखील ठाणे, नाशिक येथील धरणांतून पाणी पंप करते. मात्र, त्यांचे दर कमाल सहा तर किमान ३ रुपये इतके आहेत. मात्र, माथेरानला मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. यासाठी राज्य सरकारने एक कोटी रुपयांचे अनुदान जीवन प्राधिकरणाला दिल्यास पाणीदर ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. - वर्षा शिंदे, व्यावसायिक