अलिबाग : अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या महामार्गाच्या रुंदीकरणाकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, सुट्टीच्या काळात अलिबागला येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येने या मार्गावर लांब रांगा लागत आहेत.
अलिबाग तालुक्यात सारळ, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौले, तसेच रेवदंड्याला समुद्रकिनारा लाभलेला असून, तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आहेत. त्यातच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन सहली लक्षात घेता, या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक होते. त्यासाठी अलिबागच्या सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित अलिबाग ते वडखळ हा २३ किमीचा मार्ग केंद्राने चौपदरीकरणासाठी आपल्याकडे हस्तांतरित केला होता, परंतु भूसंपादनासाठी लागणारी मोठी रक्कम देण्यास केंद्र सरकार तयार नसल्याने दुपदरीकरणाचा प्रस्ताव पुढे आला.
परंतु, तोही प्रस्ताव बारगळला. त्यानंतर केंद्राने हा मार्ग परत राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारने केंद्राकडून हस्तांतरित करून घेण्यास नकार दिल्याने, आता या मार्गाचे नूतनीकरण कोणी करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या मार्गाचे रुंदीकरण रखडल्याने या मार्गावर सुट्टीच्या काळात वाहतूककोंडी होत असते. हा प्रश्न कधी सुटणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
अलिबाग तालुक्यातील अलिबाग, नागाव, आक्षी, किहीम, वरसोली, चौल, रेवदंडा, तसेच मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड, राजपुरी, आगरदांडा या पर्यटनस्थळी जाण्यासाठी अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या मार्गाचा वापर सर्वच जण करीत असतात. त्यामुळे अलिबाग ते वडखळ दरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरण गरजेचे असताना, त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे. - जितेंद्र म्हात्रे, पर्यटक, मुंबई