खारघरमध्ये CISFच्या जवानांचा भररस्त्यात धिंगाणा; किरकोळ कारणावरुन डॉक्टरसह कुटुंबाला मारहाण
By वैभव गायकर | Updated: November 30, 2024 16:40 IST2024-11-30T16:39:06+5:302024-11-30T16:40:02+5:30
दि.29 रोजी 10.15 च्या सुमारास हि घटना घडली.

खारघरमध्ये CISFच्या जवानांचा भररस्त्यात धिंगाणा; किरकोळ कारणावरुन डॉक्टरसह कुटुंबाला मारहाण
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: खारघर शहरात किरकोळ कारणावरून भर रस्त्यात 10 ते 15 सीआयएसएफ च्या जवानांनी डॉ श्रीनाथ परब यांच्यासह कुटुंबियाला मारहाण केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.29 रोजी 10.15 च्या सुमारास हि घटना घडली.
खारघर शहरातुन आपल्या इनोव्हा गाडीतून सेक्टर 12 प्रणाम हॉटेल येथून जात असताना सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणारी बस क्रमांक एमएच 03 ईजी 3140 यांनी परब यांची गाडी उजव्या बाजूने दाबली.अचानक अंगावर येणारी गाडी परब यांनी कशी बशी सावरली आणि पुढे बस चालकाला याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली.यावेळी बस मधुन सीआयएसएफच्या संजीव नावाच्या जवानासह 3 ते 4 जवान खाली उतरून त्यांनी थेट श्रीनाथ परब यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.हे भांडण सोडविण्यास गेलेल्या श्रीनाथ परब याचा भाऊ प्रसाद परब यांना मारहाण केली.
मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या परब कुटुंबायातील महिलांना देखील सीआयएसएफच्या जवानांनी मारहाण केली .यापैकी बहुतांशी जवान हे दारूच्या नशेत असल्याचा आरोपही परब कुटुंबीयांनी केला.या बस मध्ये असलेल्या गरुड नामक जवानाने मध्यस्ती करून कुटुंबीयांना त्यांच्या गाडीत बसवले.भर रस्त्यात सुरु असलेल्या या राड्यात सीआयएसएफचे जवान एखाद्या दंगलग्रस्त भागात जशी मारहाण करतात तशी मारहाण परब कुटुंबियांना करत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत.
संबंधित तक्रारदारांमार्फत सीआयएसएफच्या जवानांना भांडणासाठी प्रेरित करण्यात आले.तक्रारदार तरुणाने स्वतः सीआयएसएफच्या जवानांना शिवीगाळ केली.आपले कर्तव्य बजावून घरी परतत असताना हा प्रकार घडला.सीएसआयएफ ला बदनाम करणारा हा प्रकार आहे.आम्ही देखील याप्रकरणी तक्रार देणार आहोत. - अनुराग यादव (डेप्युटी कमांडर ,सीआयएसएफ मुंबई एअरपोर्ट )