विन्हेरेत पावसाचा कहर; रस्ते, पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:12 AM2017-10-09T02:12:37+5:302017-10-09T02:12:47+5:30
तालुक्याच्या विन्हेरे विभागात रविवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. महत्त्वाचे रस्ते, काही पूल पाण्याखाली गेले. शेतीमध्येही पाणी साचल्याने भातपिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.
महाड : तालुक्याच्या विन्हेरे विभागात रविवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. महत्त्वाचे रस्ते, काही पूल पाण्याखाली गेले. शेतीमध्येही पाणी साचल्याने भातपिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी ३.३० वाजता ढगांच्या विजांच्या कडकडाटासह तुफानी पावसाला सुरुवात झाली. अवघ्या तासाभराच्या पावसाने थैमान घातले. नद्यांना अचानक पूर आल्याने रेवतळे-दापोली मार्गावरील नागेश्वरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला. परिणामी, या मार्गावर दुतर्फा वाहने अडकून पडली होती. रावतळे, विन्हेरे, ताम्हाणे या गावांमध्ये गटारे ओव्हरफ्लो होत घरांमध्ये पाणी शिरून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. विन्हेरे बाग आळीकडे जाणारा पूलदेखील पाण्याखाली गेला होता. मंडळ अधिकारी, तलाठी यांना पंचनामे करण्यासाठी रवाना केले असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
कोंड मालुसरे येथील तुकाराम खेडेकर यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान तर फौजी आंबवडे गावात ग्रामस्थांची बैठक चालू असताना विजेचा लोळ पडला.