वन्य जीव सप्ताह विशेष - निसर्गाच्या संतुलनासाठी प्राण्यांची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:22 AM2018-10-04T05:22:15+5:302018-10-04T05:22:33+5:30
निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो.
दाजी कोळेकर
निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो. प्राणी म्हटल्यावर मग त्यामध्ये माणूस देखील आला; पण माणूस व इतर प्राणी यांच्यामध्ये मोठा फरक असून माणूस हा प्रगतशील प्राणी आहे. त्यामुळे प्राणी म्हणजे साधारणपणे इतर प्राणी असे समजले जाते.
अलीकडे अशा मानवेत्तर प्राण्यांची संख्या, जीवनमान, निसर्गातील असंतुलन याचा विचार करून त्यांचा खास असा दिवस असावा अशा विचारातून जागतिक प्राणी दिन साजरा करण्यात सुरुवात झाली. ४ आॅक्टोबर रोजी दरवर्षी प्राणिदिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या दिवशी प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. तसेच प्राण्यांविषयी गैरसमज, भीती, त्याचे फायदे वा उपयोग, महत्त्व याविषयी जनजागृती घडवून निसर्गाच्या संतुलनासाठी त्यांची योग्य संख्या ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, असे स्वरूप असते.
भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी व निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्राण्यांशिवाय मानवी जीवन शून्य आहे. मानव हा जरी प्राणी असला तरी प्राण्यांचे अर्थकारण मोठे असून, अनेक देशांनी यावर लक्ष केंद्रित केले आहे.
मानवी जीवनाच्या कल्याणामध्ये प्राण्यांचे मोठे योगदान व महत्त्व असून, अनेक पाळीव प्राणी प्रगतीचे आधार ठरत आहेत. जगातील मोठ्या व्यवसायात दुग्धव्यवसाय असून, त्यामध्ये भारतानेही मोठी प्रगती केली आहे. त्याचा आधार हे प्राणीच आहेत. दुग्धव्यवसाय अर्थात पशुधन यामुळे लाखो हातांना रोजगार मिळाला, शेती विकासासाठी आधारभूत ठरला आहे. पशुधनामुळे भारताची मोठी प्रगती झाली असून, श्वेतक्रांती झाली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांवर प्रेम वा दया करणारे अनेक सण-उत्सव आहेत; पण त्याविषयी जनजागृती फारशी दिसून येत नाही. त्यामुळे अशा दिनानिमित्त प्राण्यांवर दया करणे, त्यांची गरज, महत्त्व आणि आपले कुटुंब, देश व मानवी जीवनाच्या कल्याणातील योगदान याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच मानवी जीवन सुखकर होण्यासाठी, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व वन्य प्राण्यांची योग्य प्रमाणात संख्या ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होण्यासाठी चर्चा व्हावी, या अनुषंगाने या दिनानिमित्त चर्चा व जनजागृती झाली तरीसुद्धा हा दिन सफल झाला, असे म्हणता येईल.
पशुगणना सुरू
च्आपल्या देशात किती पशू आहेत याची माहिती संकलित करण्यासाठी सरकारच्या वतीने पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते.
च्ही गणना १ आॅक्टोबरपासून नुकतीच सुरू झाली असून ती ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये देशभरात प्रत्येकाकडे कोणकोणते पाळीव प्राणी आहेत याची गणना करून माहिती संकलित करून, त्यावरून शासकीय धोरण वा योजना निश्चित करण्यात येतात. ही गणना यंदा प्रथमच आॅनलाइन प्रणालीने करण्यात येणार आहे.
भारतासह जगभरातील प्राण्यांच्या अनेक जाती दुर्मीळ तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्राण्यांच्या प्रजाती नव्याने निर्माण होण्यासाठी व निसर्गाच्या चक्रामध्ये त्यांचे महत्त्व ओळखून त्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.