वन्यजीवांची गणना होणार आजपासून ; निसर्गप्रेमी संस्थांची मदत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:55 PM2019-05-17T23:55:00+5:302019-05-17T23:56:29+5:30
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांच्या प्रगणनेला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारपासून सुरुवात करण्यात येत आहे.
मुरुड/ आगरदांडा : मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांच्या प्रगणनेला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारपासून सुरुवात करण्यात येत आहे. ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचा विस्तार असून विविध वन्यजीव येथे वास्तव्य करून आहेत. शनिवारी सकाळी आठपासून ते पूर्ण दिवसभरात ही प्रगणना होणार आहे. फणसाड अभयारण्य हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असून येथे पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
फणसाड क्षेत्रात २७ पाणवठे असून या ठिकाणी वन्य जीवांची मोजदाद करण्यासाठी वन कर्मचारी वृंदांनी मचाण बांधले आहे. मोजदादीसाठी निरीक्षण टॉवरची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. या प्रगणनेसाठी वनकर्मचारी यांच्याबरोबर निसर्गप्रेमी संस्था यांची सुद्धा मदत घेतली जाणार असून प्रगणनेचे काम अगदी चोखपणे बजावले जाणार आहे. एका मचाणवर तीन माणसे नियुक्त केली जाणार असून अशा २७ पाण्याची ठिकाणे आहेत तिथे रात्रभर जागता पहारा करून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राणी व पक्ष्यांची मोजदाद होणार आहे. या विशेष कामासाठी फणसाड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक बी.बी.बांगर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पाणवठे ठिकाणाव्यतिरिक्त १४ नाईट व्हिजन कॅमेऱ्यांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. फणसाड अभयारण्यातील विविध ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेºयांच्या क्षेत्रात वन्यजीव कैद होऊन मोजदाद करताना मदत होणार आहे. त्याचप्रमाणे केतकीचा तलाव, विधुर धरण चाकाचा माळ व सावरट तलाव येथे सुद्धा टीम तैनात केली असल्याची माहिती प्रदीप चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गतवर्षीची गणना
या अभयारण्यात १७ प्रकारचे वन्यप्राणी यामध्ये बिबट्या, सांबर,भेकरे, डुक्कर, शेकरु, पिसोरी, ससा, काळामांजर, रानमांजर, जवादा, साळिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच या अभयारण्यात ७१८ प्रकारचे वृक्ष, १७ प्रकारचे सस्तन प्राणी ,२७ प्रकारचे साप, १६४ प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी ,९० प्रकारची फुलपाखरे यामध्ये ब्लू मॉरमॉन, मॅप व आदि फुलपाखरु दिसून येतात. गेल्या वर्षी प्राण्याची गणना केली त्यामध्ये बिबट्या, गिधाड, पिसोरी, ससा, काळामाजर, साळिंदर यांची संख्या पूर्णत: रोडवली होती. ही संख्या ० होेती. सांबर २, भेकरे २, डुक्कर ३, शेकरू १, रान मांजर १, मुंगुस १, माकडे १९, वानर ४ , मोर ६