पंतप्रधान मोदींकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:03 AM2023-06-02T11:03:13+5:302023-06-02T11:05:13+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे.
रायगड- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी करणार असल्याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण सगळ्यांनी मागच्या जन्मी पुण्य केलं होतं म्हणून आपल्याला राज्याभिषेक सोहळ्याला येण्याची संधी मिळाली, ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जगभरातून लोक आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत.
'या राज्याभिषेकाने कॅलेंडर बनवलं. राज्याभिषकाने नवी नाणी तयार केली. गडकिल्ल्यांना नव अस्थित्व दिलं. भाषा शुद्धीकरणाचे प्रयत्न केलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे मुद्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेव्हीच्या राजमुद्रेवर ठेवली आहे. अगोदरची परकीयांची राजमुद्रा काढली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीला झाले पाहिजे अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.