‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 12:42 AM2020-10-16T00:42:45+5:302020-10-16T00:45:47+5:30

जिल्ह्यात पालकमंत्री कक्षाची करणार स्थापना, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

Will the district administration be controlled from the 'Guardian Minister's cell' ?; Get rid of red tape | ‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

Next

आविष्कार देसाई 

रायगड : नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कामासाठी संबंधित प्रशासकीय कार्यालयात खेटे मारूनही त्यांना अपेक्षित आणि गुणात्मक समाधान मिळत नाही. यावर आता उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून ‘लोकाभिमुख सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करतानाच प्रशासनावर एक प्रकारे थेट अंकुश ठेवला जाणार असल्याचे चित्र आहे.

दैनंदिन जीवन जगताना नागरिकांचा प्रशासकीय कामाशी संबंध येतो. काही वेळेला प्रशासकीय लालफीतशाही आडवी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दोष व्यवस्थेचा असतो मात्र सरकारच्या नावाने नागरिक खडी फोडतात. सरकार आणि प्रशासन अशा कारणांमुळे संबंध बिघडण्याच्या घटनाही घडलेल्या अनुभवास आलेल्या आहेत. याच कारणासाठी राज्यातील मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘जनता दरबार’ अशा संकल्पना राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुका, विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री कक्षाच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. यासाठी वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी त्यांची मूळ संकल्पना असली तरी प्रशासनावरही याच माध्यमातून थेट वचक ठेवण्यात मदतच मिळणार असल्याचे दिसून येते. प्रशासन आणि सरकार हे दोन्ही घटक एकमेकांसाठी पूरक असले पाहिजेत. यातील एखादा घटक जरी वरचढ झाला तर मूळ लोकशाही व्यवस्थेला अडचणीचे ठरू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

नागरिकांशी थेट संवाद
पालकमंत्री कक्ष स्थापन झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधणे सोपे जाणार आहे. तसेच कामाचा निपटारा करताना गुणात्मकता जपण्याकडे स्वत: पालकमंत्र्यांचे लक्ष राहणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता थातूरमातूर उत्तर देता येणार नसल्याचे बोलले जाते. पालकमंत्री यांच्याच देखरेखीखाली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याने त्रास कमी होणार आहे. प्रशानाकडून लवकर होणाऱ्या कामासाठीही काही वेळा जाणीवपूर्वक उशीर होतो. त्यामुळे सातत्याने कार्यालयात खेटे मारूनही काम होत नाही. आता त्यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

Web Title: Will the district administration be controlled from the 'Guardian Minister's cell' ?; Get rid of red tape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.