अलिबाग : रायगडचे नवे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पर्यटन जिल्हा असलेल्या रायगडच्या सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हेतर, कायदेशीर अडचण असल्यास वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर थेट संपर्क साधण्याचे आवाहनही रायगडकरांना केले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने ७ आॅक्टोबर रोजी बदलीने पद स्थापन करण्याचे आदेश केले. त्यानुसार रायगडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी गुरुवारी (८ आॅक्टोबर) पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. अशोक दुधे यांनी यापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील पनवेल विभाग-२ या ठिकाणी पोलीस उपआयुक्त म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अशोक दुधे यांनी रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटकांची सुरक्षितता, महिला व बालकांची सुरक्षितता त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा सागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याने जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेवर भर देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अशोक दुधे यांच्या कामाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.वैयक्तिक संपर्क साधाकोणत्याही नागरिकास काही कायदेशीर अडचण असल्यास आपल्या ९८७०५६२००१ या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्र मांकावर संपर्क करावा. तुमच्या अडचणींचे योग्य ते कायदेशीर निराकरण केले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी रायगडच्या जनतेला केले आहे.