२०१९मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करणार - शिवसेना मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:14 AM2017-12-25T01:14:00+5:302017-12-25T01:14:21+5:30
गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा
महाड : गुजरातमधील निकालांनी जनमत बदलत असल्याचे संकेत दिले आहेत. पुढे काय ते येणारा काळ ठरवेल. मात्र, राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून २०१९च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले. राज्यामध्ये जरी शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव असला तरी
केंद्रात आम्ही (शिवसेना आणि भाजपा) एनडीए म्हणूनच निवडून आलेलो असल्यामुळे केंद्रात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट के ले.
शनिवारी महाडच्या दौºयावर आलेल्या अनंत गीते यांनी वेळात वेळ काढून पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर मते व्यक्त केली. आम्ही सत्तेत असू किंवा नसू, सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करेल, असे धोरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले होते. १९९५मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी त्याच पद्धतीने काम केले आणि आता उद्धव ठाकरे सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे ते म्हणाले. २०१९च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच आम्ही त्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. रोहा येथे आयोजित केलेला निर्धार मेळावा त्याचाच एक भाग होता. असेच निर्धार मेळावे रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन येथेही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुन्हा लोकसभेमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत होईल का, असे विचारले असता त्यांनी निवडणूक लढवायची की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे; पण मागच्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेता, सुनील तटकरे हे पुढील लोकसभा लढविण्याचे धाडस दाखवतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाचे इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम डिसेंबर २०१८पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल ते इंदापूर दरम्यानचे काम वादात अडकले आहे. मात्र, पनवेल ते वडखळ दरम्यानचे काम जे. एम. म्हात्रे हे करीत असून, ते हे काम वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान सडक योजना नव्याने सुरू होत असून, त्यामध्येही आपण काही रस्ते प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महाड येथे लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असेही गीते यांनी या वेळेस सांगितले.