मुंबई : जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आई सुनंदा यांनी बुधवारी जुहू पोलिसांत दाखल केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.सुनंदा शेट्टी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मे २०१९ ते फेब्रुवारी २०२० या दरम्यान कर्जत परिसरात चार हेक्टर जमिनीबाबत सुधाकर घारे यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. मात्र काही काळानंतर सुनंदा यांना जमिनीची कागदपत्रे बोगस असल्याचे समजले.
मात्र जमिनीसाठी त्यांनी घारे याला १ कोटी ६० लाख रुपये दिले होते, त्यामुळे त्यांनी ते परत मागितले. मात्र घारे याने ते परत देण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सुनंदा यांनी याप्रकरणी अंधेरी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार कोर्टाने बुधवारी जुहू पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करण्यास सांगितले. कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत माने यांनी सांगितले.
सुनंदा शेट्टी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; सुधाकर घारे यांचा इशारा'मी शिल्पा शेट्टीच्या मातोश्री सुनंदा शेट्टी यांनी जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक केली नसून उलट त्यांनीच करारानुसार ४५ दिवसांत होणारा व्यवहार अद्याप पूर्ण न करता उलट माझ्यावरच फसवणुकीची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी प्रसार माध्यमात माझी बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे सुनंदा शेट्टी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.' असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कर्जत तालुक्यातील एक शेतघरासह जमिन विकत घेण्याचा व्यवहार सुनंदा शेट्टी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याशी केला होता. हा व्यवहार मुदतीत पूर्ण न करता प्रत्येक वेळी तारीख पे तारीख देत तो आजपर्यंत लांबवत नेला आणि उलट घारे यांचीच तक्रार पोलीस ठाण्यात केली. प्रसार माध्यमांमधून याप्रकरणी भाष्य करण्यात आले. यामुळे बदनामी होत असल्याने घारे यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेवून खुलासा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड उपस्थित होते.
'मध्यस्थांच्या मार्फत माझ्या मालकीची असलेली खरवंडी येथे असलेले सर्व्हे नंबर २९ हिस्सा नंबर २ क्षेत्र २८ गुंठे व सर्व्हे नंबर २७ हिस्सा नंबर ६ क्षेत्र २७ गुंठे जमीन व त्यामधील शेतघर सुनंदा शेट्टी यांना पसंद पडले. त्यामुळे त्यांनी माझे शेतघर व शेत जमीनीचा व्यवहार करण्यासाठी त्यांच्याच वकिलामार्फत सर्च रिपोर्ट काढून स्वतःच्या नावे स्टॅम्प पेपर काढून सामंजस्य करार केला. हा व्यवहार ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे त्या करारात नमूद केले. त्यावेळी हा व्यवहार ३ कोटी ७५ लाख रुपयांना ठरला होता. त्यांनी त्यावेळी बायाणा म्हणून १ कोटी ६० लाख रुपये धनादेशाद्वारे मला दिले. मात्र त्यांनतर मात्र पुढील व्यवहार पूर्ण झालेला नाही. - सुधाकर घारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद