अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात मनरेगा विशेष रोजगार अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ‘मागेल त्याला रोजगार’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष रोजगार अभियानामुळे मजूर तसेच बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या अभियानांतर्गत गावागावांत विविध कामे करण्यात येणार आहेत.
या रोजगार योजनेतून काम करण्यासाठी इच्छुकांनी रोजगाराची मागणी करणे आवश्यक आहे. ज्या मजुरांनी मनरेगा अंतर्गत नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. मनरेगा अंतर्गत हाती घ्यावयाच्या कामांबाबत जनजागृती करावी तसेच कामांचे नियोजन करून कामे पूर्ण करावीत. याबाबत सर्व पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
रोजगार हमी योजने अंतर्गत होणारी कामे
n लेबर बजेटच्या उद्दिष्टानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीकडून मनुष्य दिवस व कामे पूर्ण होत असल्याची खात्री करणे.n मागेल त्याला काम देणे.n नवीन अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी, निवारा केंद्र, गुरांचा गोठा, घरकूल नवीन बांधकामे व दुरुस्ती.n वाडी-वस्ती-अंगणवाडी-आरोग्य उपकेंद्र-शाळांसाठी पोहोच रस्ता तयार करणे.n वैयक्तिक शौचालये, मोठ्या गटारी बांधणे.n विहीर, तलाव, नदी, नाले यामधील गाळ काढणे.n शेतरस्त्यांचे मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण करणे.n फळबाग लागवड करणे.n जमिनीची धूप थांबविण्यासाठी व जमिनीत पाण्याचा जागीच निचरा करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवून पाणीटंचाई दूर करणे.
जल संधारणाची कामे पाणीटंचाई निर्माण होऊ नये व मुबलक पाणी उपलब्ध होण्याकरिता जल संधारणाची कामे करणे अशी कामे ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अशी कामे करण्यात येणारी आहेत.