माथेरान : केंद्र सरकारने २००३ मध्ये माथेरानला इको सेन्सेटिव्ह झोन लागू करताना अधिसूचनेत वाहनबंदी केली आहे, त्यामुळे ई-रिक्षासाठी या अधिसूचनेत बदल करणे आवश्यक आहे. या विषयी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत दिल्ली येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. माथेरानच्या श्रमिक हातरिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, त्या वेळी त्यांनी सांगितले.
माथेरानच्या हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्तीसाठी ई-रिक्षाची मागणी संघटना सातत्याने केंद्र सरकारकडे करीत असल्याचे नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याच प्रमाणे राज्य सरकारने दोनदा ई-रिक्षासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ई-रिक्षासाठी सर्वाेच्च न्यायालयातून परवानगी घ्यावी, असे पत्र पर्यावरण खात्याचे सचिव ललित कपूर यांनी राज्य सरकारला दिले आहे. यामुळे संघटनेने मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या माथेरानच्या ई-रिक्षासाठी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे हे मागील सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूर येथील नितीन गडकरी यांचे मित्र शरद काळे हे माथेरानला फिरावयास आले होते. त्या वेळी हातरिक्षा चालकांच्या वेदना पाहून खूपच दु:ख झाले होते. या श्रमिकांना आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी ई-रिक्षाचा उत्तम पर्याय असल्याचे गडकरी यांच्या निदर्शनास काळे यांनी आणून दिले. या वेळी श्रमिक रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सुनील शिंदे आदी उपस्थित होते.