जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणाऱ्या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या ८८.३४ टक्के म्हणजे १ लाख ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. द्वितीय क्रमांकाचे महत्त्वाचे पीक असणाºया नागलीची लागवड ५.७० टक्के म्हणजे ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
रायगड जिल्ह्याचे भात हे प्रमुख पीक असून २०१८-१९च्या खरीप हंगामात भाताचे क्षेत्र जिल्ह्यात १ लाख ४ हजार १०० हेक्टर होते, त्यात यंदा ५०० हेक्टरने वाढ होवून ते १ लाख ४ हजार ६०० हेक्टर झाले आहे. २०१८-१९च्या खरीप हंगामात नागलीचे ५ हजार ६३० हेक्टर असणारे लागवड क्षेत्र यंदा १ हजार १२५ हेक्टरने वृद्धिंगत होवून ६ हजार ७५५ हेक्टर झाले आहे.
भाताची जिल्ह्यात सर्वाधिक लागवड अलिबाग तालुक्यात १४ हजार ३०० हेक्टरात होणार असून त्या खालोखाल महाड तालुक्यात १३ हजार ३०० हेक्टर तर माणगावमध्ये १२ हजार ५०० हेक्टरात भात लागवड होणार आहे. नागलीची जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार हेक्टर लागवड माणगाव तालुक्यात होणार आहे तर महाडमध्ये १ हजार ५०० तर पोलादपूरमध्ये १ हजार हेक्टरवर नागलीची लागवड होणार आहे. इतर तृणधान्यांची सर्वाधिक लागवड माणगाव तालुक्यात १ हजार २०० हेक्टरवर होणार आहे. उर्वरित पिकांमध्ये १.१४ टक्के क्षेत्रावर म्हणजे १ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर तूर, ३.८८ टक्के क्षेत्रावर म्हणजे ४ हजार ६०० हेक्टरावर इतर तृणधान्ये तर ०.८७ टक्के क्षेत्रावर म्हणजे १ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर इतर कडधान्यांची लागवड होणार आहे.
गत हंगामात भाताच्या उत्पादकतेत ५२ किलो प्रति हेक्टरी वाढ२०१८-१९च्या खरीप हंगामात भाताची सरासरी उत्पादकता २ हजार ७६९ किलो प्रति हेक्टर साध्य झाली होती. त्यापूर्वीच्या सरासरीपेक्षा ही उत्पादकता ५२ किलो प्रति हेक्टरी अधिक प्राप्त झाली आहे.२०१८-१९ मध्ये नागलीची उत्पादकता ९९२ किलो प्रति हेक्टर प्राप्त झाली होती, ती सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत १७५ किलो प्रति हेक्टर अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाली, माणगाव, श्रीवर्धनचा सॅटलाइट सर्व्हे ठरला चुकीचा२०१८च्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरी ३२०१.२ मिमी पाऊस झाला होता, त्या तुलनेत २०१८-१९च्या खरीप हंगामात २ हजार ७९६ मिमी म्हणजे ८७.३४ टक्के पाऊस पडला होता. गत खरीप हंगामात सुधागड तालुक्यात जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला होता. सॅटलाइट सर्व्हेच्या आकडेवारीनुसार सुधागड-पाली, माणगाव व श्रीवर्धन या तीन तालुक्यांत पिकाच्या इंडेक्सनुसार दुष्काळसदृश स्थिती दर्शविण्यात आली होती. मात्र पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असल्यामुळे सॅटलाइट इंडेक्स आकडेवारीची प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून पाहणी करून पडताळणी केली असता, या तीन तालुक्यांतील भाताची उत्पादकता सरासरी इतकी प्राप्त झाली असून दुष्काळसदृश स्थिती नसल्याचे निष्पन्न झाले. परिणामी सॅटलाइट सर्व्हे हे प्रसंगी चुकीचे ठरू शकतात हे या निमित्ताने स्पष्ट झाले.