कर्जत : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे, त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. कोकणात पूर्वीपासून असलेली युतीची मक्तेदारी या वेळीही कायम राहील, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथील आयोेजित सभेत ते बोलत होते.देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.चव्हाण म्हणाले, कार्यकर्त्यांनीही आपल्यात भावकी असल्याने विरोधी पक्षातील नेते पदाधिकारी घरी येऊन आपल्यात संभ्रम निर्माण करतील त्याला बळी पडू नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मागील वेळेस आपण मोठ्या फरकाने मावळमध्ये भगवा डौलाने फडकावला होता. मात्र, या वेळेस आपल्यासमोर केवळ एक उमेदवार नसून एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, आपणही गाफील न राहता आपली प्रतिष्ठा आपणही पणाला लावली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार आपण घराघरांत पोहोचवले पाहिजेत तेव्हा आपली सर्व शक्ती पणाला लावून काम करा, अशा सूचना या वेळी रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना संपर्कप्रमुख दत्ता दळवी, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आदी उपस्थित होते.
कोकणामधील युतीची मक्तेदारी कायम राखणार - रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:09 AM