माथेरान : रायगड जिल्ह्यातील एक सुंदर रमणीय स्थळ अर्थातच माथेरान होय; परंतु नव्यानेच मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारून येथील उणिवा, पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लक्ष केंद्रित केले आहे. येथील सर्व समस्या दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरोत्थान मार्फत तत्काळ २५ कोटी रुपयांच्या निधीकरिता तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
तीन वर्षांपासून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ई-मेलद्वारेही अनेकदा निवेदने उद्धव ठाकरेंना दिली आहेत. त्या अनुषंगाने ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्य सचिव अजय मेहता यांच्या सोबत माथेरानच्या प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन केले होते, त्या वेळी माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी रामदास कोकरे यांसह नगरपरिषद अभियंताही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिव मनीषा पाटणकर यांना येथील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरोत्थान मार्फत तत्काळ २५ कोटी रुपयांच्या निधीकरिता तांत्रिक तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. ही तांत्रिक मान्यता घेऊन संबंधित विभागाकडून १५ दिवसांत प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले आहे. जानेवारी महिन्यात (२०२०) मध्ये हा निधी नगरपरिषदकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मागील वर्षी २०१८ मध्ये युवा सेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी माथेरानला भेट दिली होती, त्या वेळेस वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल (आॅलिम्पिया रेसकोर्स) या भव्य मैदानाची पाहणी करून इथे फुटबॉल प्रशिक्षण घेण्यात आले होते. या मैदानाचा पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी सात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरून प्रस्ताव सादर केला असून, त्यास तांत्रिक तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. सचिवालयात हा निधी जानेवारीत जमा होणार आहे.
नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ७ डिसेंबर रोजी फोनवरून माथेरानमधील सर्व काही समस्या दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री दालनात उपस्थित राहून प्रश्नांची उकल करावी, असे सूचित केले आहे.