तरंगत्या जेट्टीसाठी प्रयत्न करणार - सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:45 AM2019-12-02T01:45:39+5:302019-12-02T01:46:02+5:30
रायगडचे खासदार सुनील तटकरे हे एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असता स्थानिक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर व पद्मदुर्ग किल्ल्यावर तरंगती जेट्टी व्हावी, यासाठी प्रयत्न करणारा असून दिल्लीत गेल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याकडे या किल्ल्यावर जेट्टी होण्यासाठी ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
रायगडचे खासदार सुनील तटकरे हे एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असता स्थानिक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. या दोन्ही किल्ल्यावर तरंगती जेट्टी होण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून आठ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; परंतु आजपर्यंत दीड वर्ष होऊनसुद्धा पुरातत्त्व खाते दिल्ली येथून या प्रस्तावासाठी ना हरकत दाखला न दिल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. किंवा त्या कामास सुरुवातसुद्धा झाली नाही, असे सांगितले. दिल्लीत गेल्यावर या कामाला गती मिळवून देऊ, त्याचप्रमाणे पाठपुरावा करण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.
रायगडमध्ये शेकाप सहकारी पक्ष राहणार
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस मिळून सरकार बनवल्याने राजकारणाला एक नवीन दिशा मिळाली आहे. तयार झालेले हे सरकार निश्चितच पाच वर्षे टिकेल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यामध्ये जरी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असली, तरी रायगड जिल्ह्यामधील शेतकरी कामगार पक्ष हा आमचा सहकारी पक्ष राहणार आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेली आमची आघाडी अशीच अविरत राहणार असल्याचे सांगितले.