रायगड- आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवात झाली असून या शिबीरासाठी राज्यभरातून नेते उपस्थित आहेत. दरम्यान, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी बोलताना इशारा दिला. "माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार असून, त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल असे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वैचारिक मंथन शिबीरात केले.
'अजितदादांनी पक्षातील लोकशाही समोर आणली तेव्हा....', धनंजय मुंडेंनी पवार गटावर केले आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराच्या शेवटच्या सत्रात खासदार प्रफुल पटेल यांनी जोरदार हल्लाबोल केला. या शिबिराला उपस्थित असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यादेखील पोटात खूप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत असंही प्रफुल पटेल म्हणाले.
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्या पक्षाचा प्रवास फक्त विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत नाही पुढील २० ते २५ वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे . मी शरद पवार साहेब यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि १९८६ मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चालले आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
"पवार साहेबांच्या पाठीशी राहिलो तसा दादांच्या पाठीशी राहणार"
हे शिबीर घेण्यामागे एक भावना आहे. पक्षात चिंतन, मंथन पक्षाचे ध्येय धोरण ठरवले जाते म्हणून हे शिबीर घेतले आहे, असंही प्रफुल पटेल म्हणाले. अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे हजारो, लाखो लोक आहेत. अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय ही साधी गोष्ट नाही असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
जसा शंभर टक्के शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहिलो, तसा दादांच्या पाठीशी राहणार आहे, असंही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. अजितदादा पवार यांनी घेतलेली महत्वाची भूमिका ही राज्यासाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आहे हेही प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले.
"येणाऱ्या काळात आपली कसोटी आहे. १३० दिवसानंतर मतदानाची वेळ येणार आहे. शंभर दिवसात निवडणुकीची वाटचाल सुरू होणार आहे. काही राज्यातील निकाल काहीही येतील परंतु देशाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने निकाल लागेल असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.