रोहा : तालुक्यात परतीच्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने त्याचा फटका रहिवाशांना व शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर बसला. तालुक्यात चक्रि वादळासह अचानक आलेल्या गारपिटीच्या पावसाने रोहा तालुक्यातील बहुतांश गावांतील घरांची पडझड झाली आहे. तर अनेक जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील किल्ला गावातील रहिवासी सुरेश मुंढे यांच्या घरी नातीच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. मात्र विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने क्षणार्धात मुंढे यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे उडाले. हे पत्रे वाढदिवसासाठी आलेल्या उपस्थितांच्या अंगावर पडल्याने पाच ते सहा जण जखमी झाले. त्यांना परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित तरुणाने मेन स्वीच बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेचे गांभीर्य ओळखून रोहा तहसीलदार सुरेश काशिद यांनी दुखापतग्रस्तांची भेट घेऊन चौकशी केली. संतोष राणे, नितेश मुंढे, हरेश पवार, पांडुरंग जाधव, सुशीला गायकवाड, सूर्यकांत मुंढे यांना दुखापत झाली आहे. तर त्याच परिसरातील नितीन बामुगडे यांच्या चाळीतील घरावरील पत्रे उडाले. वादळी वाऱ्याने रोहा-कोलाड राज्यमहामार्गावरील शेतकी शाळा, संभे येथे झाड पडल्याने वाहतूक थांबली होती. मात्र अग्निशमन दल जवान, ग्रामस्थ, शासकीय यंत्रणेने क्रेनद्वारे रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, अनेक गावांना जोरदार गारपीट पाऊस व चक्रिवादळाने मोठा तडाखा बसला. यामध्ये अनेकांच्या घरांची पडझड झाली असून विद्युत खांब, विद्युत तारा व झाडे कोसळले आहेत. तालुक्यात जीवितहानी झाली नसली तरी वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.