माणगाव: आज 6 नोव्हेंबर 18 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी पावसाने मुंबई-गोवा महामार्गावर अनेक झाडे पडल्याने हा महामार्ग सुमारे एक तास बंद झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तालुक्यातील अनेक रस्त्यावर झाडे व फांद्या पडल्या होत्या. तर अनेक ठिकणी विजेचे पोल वाकले होते, वीज तारा पडल्या. त्यामुळे एक दिवस संपूर्ण तालुका अंधारमय राहणार आहे. माणगाव तालुक्यात सलग तीन दिवस जोराचा पाऊस पडत असताना आज आलेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने बऱ्याच घरांच्या पत्र्याचे व कौलाचे छप्पर उडून गेल्याच्या घटना घडल्या. तर काही घरानवर झाडे पडली. तसेच महावितरणचे विजेचे पोल काही ठिकाणी वाकलेले आहेत तर काही ठिकाणी वीज वाहक तारा पडल्या असल्याने गोरेगाव व लोणेरेमधील आसपासचा भाग अंधारमय राहणार आहे.
या भागातील वादळी पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावर बसला असून, सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर रेपोली, ऊसरघर, नवघर , लोणेरे या गावात मोठी झाडे पडल्याने संपूर्ण महामार्गावर अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. मात्र तत्काळ पोलीस यंत्रणेने जेसीबी बोलावून रस्त्यावरील झाडे दूर करून वाहतूक पूर्ववत करून दिली. या सलग तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे. आज आलेल्या या मुसळधार वादळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भाताची केलेली मळणी सुद्धा भिजली गेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी कडधान्ये पेरली आहेत. या आलेल्या पावसाने मात्र शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे.