पोलादपूर : तालुक्यातील कामथे, बोरघर भागासह देवळे, केवनाळे, आंबेमाची, चिरेखिंड, रानकडसरी परिसरात सोमवारी अवकाळी पावसाचा दणका बसला. कापडे ग्रामपंचायत हद्दीतील दहीदुर्गवाडी शाळेतील शौचालयाचे पत्रे उडाले तर एक झाड कोसळले. परिसरातील लक्ष्मण हनवती सकपाळ यांच्या घराचे पत्रे वादळात उडून नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. दुपारपासून वातावरणात बदलल्याने वादळी वाºयासह पावसाला सुरवात झाली.गेल्या २४ तासात वातावरणातील बदलामुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती. त्यानुसार दुपारी ३ नंतर तालुक्यातील कापडे खोºयासह कामथे भागात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली. त्याच प्रमाणे उन्हात वाळत टाकलेल्या आगोटीच्या साहित्याची जमवाजमव करताना महिला वर्गाची धांदल उडाली.तालुक्यातील कापडे ग्रामपंचायतीजवळ असलेले झाड कोसळल्याने वाकण पितळवाडीकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच नायब तहसीलदार सुसलादे, आर. डी. ससाणे, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन झाड हटवले.सोमवारी आलेल्या वादळात दहीदुर्गवाडी शाळेतील शौचालयाचे पत्रे उडाले. मात्र यावेळी शाळेत तसेच शाळेच्या आसपास कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.भवनवाडी येथील लक्ष्मण हनवती सकपाळ यांच्या घराचे पत्रे उडाले. यामध्ये कापडे खोºयात जवळपास लाखो रुपयांचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे.शहरात ढगांचा गडगडाट होत असताना कापडे व कामथे खोºयाला पावसाने झोडपून काढले आहे. महसूल विभागाने या भागात सायंकाळी उशिरा पाहणी केली आहे.
पोलादपूरमधील कामथे खोऱ्यात वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:50 AM