वादळी पावसाचा रोह्याला फटका
By admin | Published: September 26, 2016 02:19 AM2016-09-26T02:19:03+5:302016-09-26T02:19:03+5:30
गेले सात ते आठ दिवस रोहे तालुका व शहरात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत आहे. शहरालगतच्या चारही डोंगर माथ्यावरून पावसाच्या पाण्याचे
रोहा : गेले सात ते आठ दिवस रोहे तालुका व शहरात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत आहे. शहरालगतच्या चारही डोंगर माथ्यावरून पावसाच्या पाण्याचे लोटच्या लोट शहरातील लोकवस्तीत व बाजारपेठेत येत असल्यामुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. त्यातच नालेसफाईत नापास ठरलेल्या धाटाव एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे येथील कारखान्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. सलग दोन दिवस पावसाने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे १० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज हाती आला आहे. पर्यायाने काही कारखाने दोन दिवस बंद राहणार, अशी माहिती देखील प्राप्त झाली आहे.
रोहे तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील चणेरा, भालगाव, घोसाळे, कांटीबोडण, मेढे, खारापटी, यशवंतखार, सानेगाव, नागोठणे, कोलाड, सुतारवाडी, धाटाव एमआयडीसीसहित रोहे शहराला पावसाने झोडपून काढले आहे. परतीच्या पावसाचा जबरदस्त तडाखा अनेकांना बसला आहे. आठवडाभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यातच दोन दिवसापासून पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. डोंगर विभागात मुक्काम ठोकणाऱ्या पावसामुळे धाटाव एमआयडीसीला प्रचंड फटका बसला. धाटाव औद्योगिक क्षेत्रातील औषध निर्मिती करणारी एफडीसी कंपनी व फूड डाय निर्मिती करणारी निलिकॉन, रोहा डाय, बेक केमिकल, युनिकेम या रासायनिक उत्पादन व औषध तयार करणाऱ्या कंपनीत रात्री एकच्या दरम्यान पाणी शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. नव्याने सुरू झालेल्या व काम होत असलेल्या लगतच्या कंपन्यांनी मातीभराव मोठ्या प्रमाणात केल्याने तसेच यंदा एमआयडीसीने नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्याने पाणी नाले व गटार मार्गाने न जाता रस्त्यावरच तुंबले. त्यातच पावसाचे प्रमाण वाढल्याने बहुतांश कंपनीत मातीमिश्रित पाणी शिरल्याने कारखानदारांची एकच तारांबळ उडाली. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्राला फार मोठा फटका बसला असून अंदाजित दहा कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेला एफडीसीचे असिस्टंट जनरल मॅनेजर एन.एम. कोळेकर व व एच.आर. मॅनेजर फडतरे यांनी दुजोरा दिला आहे. (वार्ताहर)