दहा दिवसांतच कृत्रिम फुप्फुस काळवंडले; हवेच्या दर्जाची तपासणी, प्रदूषणाची धोक्याची पातळी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 01:36 AM2021-01-29T01:36:51+5:302021-01-29T01:37:14+5:30
वातावरण फाउंडेशनतर्फे १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली.
पनवेल : खारघरच्या हिरानंदानी चौकात वातावरण फाउंडेशनने १५ जानेवारी रोजी प्रदूषणाची गुणवत्ता तपासण्यासाठी लावलेले पाढंऱ्या शुभ्र रंगाचे कृत्रिम फुप्फुस अवघ्या दहा दिवसातच काळवंडले आहे. यामुळे खारघरसह पनवेल महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसून येत आहे.
खारघर-तळोजा-पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायुप्रदूषणाबाबत सामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वातावरण फाउंडेशनने खारघरच्या चौकात कृत्रिम फुप्फुसे बसवली होती. अशाच प्रकारची कृत्रिम फुप्फुसांचे डिजिटल फलक यापूर्वी जानेवारी २०२०मध्ये मुंबईच्या वांद्रे परिसरात उभारण्यात आली होती. ती फुप्फुसेही १४ दिवसांत काळी पडली होती. तर दिल्लीत नोव्हेंबर २०१८ मध्ये तयार केलेली कृत्रिम फुप्फुसे अवघ्या ६ दिवसांत काळी झाली होती. द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स असे शीर्षक देऊन ही कृत्रिम फुप्फुसे खारघरच्या सेक्टर ७ मधील बँक ऑफ इंडिया चौकात उभारण्यात आली होती. वातावरण फाउंडेशनने केलेल्या या उपक्रमात हवेच्या अत्युच्च प्रदूषणामुळे घातक घटक आपल्या फुप्फुसात जात असल्याचे दिसून येत आहे. कृत्रिम फुप्फुसाचे बदललेले रंग यामुळे हे दिसून येत आहे. स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी या कृत्रिम फुप्फुसांचा रंग काळा व्हायला सुरुवात झाली होती आणि सातच दिवसांत हा रंग करडा झाला. सोमवार दि. २५ जानेवारीला मात्र या फुप्फुसांचा रंग पूर्णतः काळा झाल्याचे दिसून आले.
वातावरण फाउंडेशनतर्फे १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यानुसार असे निदर्शनास आले की, खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेतात. या भागातल्या हवेत सकाळी ६ ते ८ या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम २.५ हा घटक सर्वाधिक असतो.