कर्जत : डॉक्टर हजर नसल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेने बाळंतपण केले, पण त्या बाळंतपणानंतर प्रसूत महिला अत्यवस्थ झाल्याने, तर बाळ गुदमरल्याने त्याचाही जीव गेला आहे. आरोग्य यंत्रणेच्या चुकीमुळे दोघांना आपले जीव गमवावे लागले असल्याने, कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.पिंपळोली येथील माहेर असलेल्या पूनम रूठे यांना बाळंतपणासाठी ४ आॅक्टोबर रोजी पहाटे पिंपळोली गावातून रिक्षाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. बाळ होऊन दोन तास झाले, तरी रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्यामुळे आरोग्यसेविका सरोदे यांनी पूनम यांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ वाजता पाठवून दिले.कर्जत येथे गेल्यानंतर तेथील उपजिल्हा रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे नेरळ येथून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी निघालेली रुग्णवाहिकाही कर्जत येथून पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात नेण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला. मात्र, एमजीएम रुग्णालयात नेले जात असताना, पूनम यांचा रक्तस्त्राव थांबला नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर नवजात बाळाचाही कर्जत येथून पनवेलला नेताना मृत्यू झाला.
नेरळ प्राथमिक केंद्रामुळे महिला, बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:51 PM