धावत्या उरण - नेरुळ रेल्वेमध्ये उरणच्या महिलेच्या पुढाकाराने महिलांनी केली महिलेची प्रसूती; निकिता ठरल्या देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:51 PM2024-02-07T20:51:33+5:302024-02-07T20:56:30+5:30

धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेची उरणच्या महिलेने पुढाकार घेऊन अन्य महिलांची मदतीने सुखरूपपणे प्रसृती केल्याची घटना मंगळवारी उरण - नेरुळ रेल्वे मार्गावरील प्रवासा दरम्यान घडली आहे.

woman delivery in uran nerul local mumbai giving birth to girl child | धावत्या उरण - नेरुळ रेल्वेमध्ये उरणच्या महिलेच्या पुढाकाराने महिलांनी केली महिलेची प्रसूती; निकिता ठरल्या देवदूत

धावत्या उरण - नेरुळ रेल्वेमध्ये उरणच्या महिलेच्या पुढाकाराने महिलांनी केली महिलेची प्रसूती; निकिता ठरल्या देवदूत

मधुकर ठाकूर 

उरण : धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेची उरणच्या महिलेने पुढाकार घेऊन अन्य महिलांची मदतीने सुखरूपपणे प्रसृती केल्याची घटना मंगळवारी उरण - नेरुळ रेल्वे मार्गावरील प्रवासा दरम्यान घडली आहे. बाळबाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत.  उरण - नेरुळ रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक १२ जानेवारीपासून नियमितपणे सुरू झाली आहे. मंगळवारी ( ५) सकाळी ७.५० च्या लोकलने भवरा-उरण येथील मुजीम सय्यद हे आपली गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह वाशीकडे निघाले होते. पत्नीच्या गर्भारपणातही प्रसृतीच्या कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नसल्यानेच हे कुटुंब प्रवासासाठी निघाले होते. खारकोपर स्थानकावरुन निघालेली लोकल बामणडोंगरी स्थानकाच्या मध्यावर येताच महिलेचा विव्हळण्याचा स्वर डब्यात असलेल्या सहप्रवाशांच्या कानावर पडला.

या सहप्रवाशांमध्ये उरण हनुमान कोळीवाडा गावातील रहिवासी निकिता देवेंद्र शेवेकर या ४५ वर्षीय विवाहित महिलेचाही समावेश होता. उरण बोकडवीरा येथील खासगी रायगड ॲकॅडमीमध्ये काम करणाऱ्या निकिता त्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना घेऊन सी-वूड येथील शाळेत सोडण्यासाठी याच लोकलने प्रवास करत निघाल्या होत्या.त्यांच्याही कानावर गरोदर महिलेचा विव्हळण्याचा स्वर पडल्यानंतर निकिता चौकशीसाठी या महिलेपर्यत पोहचल्या.चौकशीत प्रसृतीच्या वेदना अनावर झाल्यानेच सदर महिला कण्हत असल्याची समोर आले.निकिता यांनी तातडीने पुढाकार घेत महिलेच्या मदतीसाठी धावल्या.त्यानंतर लोकलच्या डब्यातच असलेल्या आणखी चारपाच महिलाही मदतीसाठी सरसावल्या.

लोकलची चेन खेचून गाडी थांबवावी तर बामणडोंगरी स्थानकापासून -सी-वूड आणि नेरूळ दरम्यान प्रसृतीसाठी इस्पितळात जाण्यासाठी ना रस्ता ना कोणतेही साधन उपलब्ध होण्याची शक्यता फारस कमी होती.त्यामुळे मदतीस आलेल्या महिलांनी वेदनेनी ग्रासलेल्या गरोदर महिलेस धीर दिला.मदतीस आलेल्या महिलांनी जमा केलेल्या ओढण्याचा आडोसा करून महिलेची प्रसूती केली.या महिलेने मुलीला जन्म दिला आहे.नवजात मुलगी आणि आईस कोणत्याही प्रकारे सेप्टिक होणार नाही याची दक्षता घेऊन महिलांनी काम केले.तोपर्यंत सीवूड स्थानकावर आलेल्या लोकलमधील प्रवाशांनी मोटारमनला कल्पना दिली .मोटारमननेही नेरूळ स्थानकाशी संपर्क साधुन सुसज्ज रुग्णवाहिका, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी सज्ज राहण्याचे कळविण्यात आले होते.

नेरूळ स्थानकात लोकल येताच आधीच सज्ज असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाने सदर प्रसृत महिला व नवजात बालिकेला नेरुळ येथील मीनाताई ठाकरे  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असुन दोघेही  सुखरूप असुन उपचार घेत असल्याची माहिती मुजीम सय्यद यांनी दिली.याकामी निकिता शेवेकर यांनी तत्परता दाखवत घेतलेला पुढाकार आणि त्यांच्या पुढाकाराला ऐनवेळी अन्य महिलांची मिळालेली साथ यामुळेच महिला व नवजात बालिकेला सुखरूप सुटका झाली. याकामी महिलांची मदत व प्रशासकीय अनुभव कामी आला असल्याची प्रतिक्रिया देवदूत ठरलेल्या निकिता शेवेकर यांनी व्यक्त केली.

Web Title: woman delivery in uran nerul local mumbai giving birth to girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.