अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 05:59 IST2025-04-16T05:58:27+5:302025-04-16T05:59:20+5:30
उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप: घोटवडे येथील सुचिता थळे (२९) हिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी दाखल केले होते.

अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
अलिबाग : लाडक्या मुलीला मुलगा झाला म्हणून आई, वडिलांसह कुटुंबीय आनंदित होते. मात्र, त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. या महिलेची तब्येत खालावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. शहरातील फुटाणे रुग्णालयात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मृत महिलेच्या नातेवाइकांनी डॉक्टर, परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
घोटवडे येथील सुचिता थळे (२९) हिला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी दाखल केले. प्रसूतीसाठी सिझेरियन करावे लागेल, असे डॉ. फुटाणे यांनी सांगितले. त्यानुसार सिझेरियन केले. तिने बाळाला जन्म दिला.
सुचिताला मुलगा झाला म्हणून कुटुंबीय आनंदित होते. सायंकाळपर्यंत तिची तब्येत चांगली होती. रात्री छातीत जळजळ होत असल्याचे तिची जाऊ आश्लेषा थळे हिने परिचारिकांना सांगून डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली.
मात्र, मंगळवारी सकाळी सुचिताची प्रकृती अधिक बिघडली. त्यानंतर आश्लेषा यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी आरडाओरड केल्यानंतर डॉक्टर आले. त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सुचिताच्या नातेवाइकांनी दिली.
गुन्हा दाखल करा
या घटनेमुळे सुचिताचे नातेवाईक संतप्त झाले होते. जिल्हा रुग्णालयात त्यांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टर, परिचारिकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली.
सुचिता थळे ही महिला प्रसूतीसाठी आली होती. तिच्या पोटातील पाणी कमी झाल्याने सिझेरियन करावे लागेल असे सांगितले. प्रकृती सकाळपर्यंत चांगली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हृदयाचे ठोके कमी पडू लागल्याने उपचार सुरू केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथेही प्रयत्न केले. मात्र, हृदयाचा रक्तपुरवठा बंद झाल्याने तिचा मृत्यू झाला. -अनिल फुटाणे, स्त्रीरोगतज्ज्ञ