खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेला गमवावा लागला जीव;अलिबाग मधील घटना
By राजेश भोस्तेकर | Updated: April 15, 2025 13:53 IST2025-04-15T13:53:34+5:302025-04-15T13:53:53+5:30
महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परीचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेला गमवावा लागला जीव;अलिबाग मधील घटना
अलिबाग : मुलगा झाला म्हणून आई, वडिलांसह सर्व कुटुंबीय आनंदित होते. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आईची तब्येत घालवली गेली आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तिला आपला जीव गमावावा लागला. अलिबाग शहरातील फुटाणे रुग्णालयात ही घटना घडली आहे. महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परीचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सुचिता (२९) आणि सुशील थळे रा. घोटवडे, ता. अलिबाग यांचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तीन वर्षांनी घरात बाळ येणार म्हणून कुटुंब आनंदित होते. सुचिताला कळा सुरू झाल्यानंतर अलिबागमध्ये उपचार सुरू असलेल्या डॉ. फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी १४ एप्रिल रोजी दुपारी दाखल केले. सुचिता यांच्या पोटातील पाणी कमी झाले असल्याने सिझर करावे लागेल असे डॉ फुटाणे यांनी सांगितले. त्यानुसार सिझर करून सुचीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
मुलगा झाला म्हणून सर्व कुतुबिय आनंदित होते. सायंकाळ पर्यंत सुचिता हीची तब्येत उत्तम होती. रात्री छातीत जळजळ होत असल्याचे तिने जाऊ आश्लेषा थळे हिला सांगितले. त्यांनतर तिने तेथील परिचारिका याना सांगून डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी सुचिता हीची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनतर आश्लेषा यांनी गोंगाट घातल्यानंतर डॉक्टर आले. त्यानंतर तब्येत जास्तच बिघडली असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात सांगितले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वी सुचिता हीचा जीव गेला होता. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. डॉक्टर व परीचरिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली. त्यानुसार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.