खेड: कौटुंबिक कारणामुळे त्रस्त झालेले अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात. खेडमध्ये एका महिलेनं सासू आणि पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. महिला तिच्या मुलासह आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळांवर आली. मात्र रेल्वे प्रवाशांच्या दक्षतेमुळे तिचा जीव वाचला.गुरुवारी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास एक २८ वर्षीय महिला खेड रेल्वे स्थानकात आली. यावेळी रेल्वे स्थानकात आलेल्या मत्स्यगंधा एक्सप्रेस खाली तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. आपल्या ४ वर्षाच्या मुलाला घेऊन ही महिला रेल्वे रुळावर झोपली होती. दरम्यान, खेड स्थानकावर थांबलेल्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या महिलेला वाचवण्यात यश आले. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्यानंतर या महिलेला खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मुलासह आत्महत्या करण्यासाठी 'ती' रेल्वे रुळांवर आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 10:56 PM