अलिबाग : फेसबुकद्वारे मैत्री करून अमेरिकेतील नायजेरियन गँगने अलिबागच्या महिलेला लाखोंचा गंडा घातला आहे. तब्बल १७ लाख ६० हजार ९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी ९ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.१ मार्च २०१८ ते १४ मे २०१८ या कालावधीत ही फसवणूक झाली. अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. मधील ल्यूईस अॅन्थोनीने अलिबागमधील महिलेस फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. महिलेने ती स्वीकारली. अॅन्थोनीने ओळख वाढवली. मुलासाठी भेटवस्तू पाठवतो असे सांगून राहत्या घराचा पत्ताही घेतला. त्यानंतर दिल्ली कस्टम आॅफिसमधून एका अनोळखी महिलेने ९३२१५७९३७८ या मोबाइल क्रमांकावरून महिलेला फोन करून, तुमच्या पत्त्यावर परदेशातून परकीय चलन आणि पार्सल आले आहे. ते घेण्याकरिता कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले. पार्सल स्वीकारले नाही, तर पोलीस कारवाई होवून चौकशीला सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली. म्हणून या महिलेने बँकेच्या खात्यात आॅनलाइन पैसे भरले. काही दिवसांनी आणखी एकाने या ९१३६२६३२०४ मोबाइल क्रमांकावरून त्या महिलेला फोन करून अलिबागमधील एका हॉटेलमध्ये पार्सल घेण्याकरिता बोलावले. तेथे नायजेरियन माणसाला भेटल्या. त्याच्याकडून पार्सल घेतल्यावर त्याला घेवून घरी गेल्या. घरी पार्सल उघडले. त्यात छोटी तिजोरी होती. तिजोरी उघडण्याकरिता डिजिटल पासवर्ड टाकणे आवश्यक होते. त्याने पासवर्ड टाकून ती उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती उघडली नाही. दोन दिवसात परत येतो असे सांगून ती तिजोरी फिर्यादी महिलेकडे ठेवून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने फोन करून, तुमच्याकडे तिजोरीमध्ये विदेशी डॉलर असल्याचे सांगून तुमच्यावर फौजदारी कारवाई होईल अशी धमकी देवून पुन्हा बँकेत खात्यात पैसे भरण्यास सांगितले.आतापर्यंत या महिलेने बिहार, आसाम, कोलकाता, छत्तीसगडमधील विविध बँकांमधील खात्यात एकूण १७ लाख ६० हजार ९९ रुपये भरले. आपली मोठी फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने मंगळवारी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून तिजोरी पोलिसांच्या स्वाधीन केली. बॉम्बशोध पथकाकडून स्कॅनिंग करून तिजोरी उघडली असता, त्यात डॉलरच्या आकाराची कोºया कागदाची बंडल्स असल्याचे निष्पन्न झाले.>अलिबाग पोलीस ठाण्यात या फसवणूकप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील एकूण नऊ आरोपींचा त्यांनी वापरलेल्या मोबाइल फोन लोकेशन ट्रेसिंगद्वारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी रायगड जिल्हा सायबर क्राइम ब्रँचचे सहकार्य घेतले जाईल.
महिलेला १७ लाखांचा गंडा, फेसबुकद्वारे केलेली मैत्री पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 2:38 AM