महिला बालकल्याणचा निधी बांधकामांवर खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:53 AM2017-11-07T02:53:48+5:302017-11-07T02:53:51+5:30
तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. महिला बालकल्याणसाठी मंजूर असलेला ३१ लाखांचा निधी तसाच पडून आहे.
विजय मांडे
कर्जत : तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. महिला बालकल्याणसाठी मंजूर असलेला ३१ लाखांचा निधी तसाच पडून आहे. तर काही निधी बांधकाम विभागाची देयके अदा करण्यासाठी खर्च केला जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कुपोषण नियंत्रणावर हा खर्च झाला असता तर कर्जत तालुक्यातील बालके कुपोषित दिसली नसती.
अंगणवाड्या आणि तेथील बालके यांच्यासाठी मंजूर असलेला निधी खर्च न करणाºया अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांनी केली आहे.
शासन पंचायत समिती स्तरावर विविध खात्यांचे अनुशेष देत असते. त्या अनुशेषातील १0 टक्के रक्कम महिला बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी राखून ठेवलेली असते. कर्जत पंचायत समितीच्या अनुशेषाची ती रक्कम ४0 लाख होती, त्यातील ३१ लाखांचा अनुशेष कर्जत पंचायत समितीकडे खर्च न केल्याने शिल्लक आहे. २०१५ मध्ये महिला बालकल्याण विभागासाठी मंजूर असलेली १0 टक्के अनुशेष तत्कालीन गटविकास अधिकारी अशोक थुले यांनी बांधकाम विभागाची बिले अदा करण्यासाठी वर्ग करण्यात आले. हा निधी महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांवर खर्च केला असता तर कर्जत तालुक्यातील कुपोषण वाढले नसते आणि राज्य सरकारला कुपोषण निर्मूलनासाठी ७५ लाखांचा निधी देण्याची वेळ आली नसती. तालुक्यात कुपोषण कमी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय स्तरावर बाल उपचार केंद्र उघडावी लागली होती. त्यातून कर्जत पंचायत समितीने कोणताही धडा घेतला नाही आणि त्यावर्षी महिला बालकल्याण विभागाचा अनुशेष बांधकाम विभागाची बिले अदा करण्यासाठी खर्च केला गेला. हीच कार्यपद्धती कर्जत पंचायत समितीने २०१६ मध्ये कायम ठेवली असून त्यावेळी देखील विद्यमान गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. यावर्षी महिला बालकल्याण विभागाचा १० टक्केचा ३१ लाखांचा अनुशेष कर्जत पंचायत समितीकडे शिल्लक असून महिला बालकल्याण अंतर्गत येणाºया विविध कामांसाठी, कुपोषण निर्मूलनासाठी हा निधी खर्च केला जाऊ शकत असताना तो खर्चाविना पडून आहे.
एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये वस्तू खरेदी, कुपोषण निर्मूलनासाठी आवश्यक हिमोग्लोबिन टॅबलेट, कुपोषित बालकांच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढावे म्हणून अतिरिक्त पोषण आहार, किशोरवयीन मुली,गरोदर महिला, स्तनदा माता यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी शिबिराचे आयोजन अनुशेष निधीमधून करता येते. महत्वाच्या कार्यक्र मांवर देखील खर्च करण्याची मानसिकता कर्जत पंचायत समितीने दाखवली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कर्जत तालुक्यातील कुपोषण वाढत असून निधी असताना खर्च केला जात नाही? अशी स्थिती कर्जत तालुक्यात प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाला देखील अनुशेष निधी असताना अन्य विभागाचा निधी वर्ग करण्याची प्रथा कर्जत तालुक्यात पाडली गेली असल्याने कर्जत पंचायत समितीला लेखा परीक्षण विभागाने धारेवर धरले आहे.