भाकरीमुळे महिलांना मिळाला रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:30 AM2020-01-08T01:30:15+5:302020-01-08T01:30:22+5:30
मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे शनिवार-रविवार व सलग सुट्टी असल्या की, पर्यटकांची संख्या वाढत आहे.
मुरुड : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने येथे शनिवार-रविवार व सलग सुट्टी असल्या की, पर्यटकांची संख्या वाढत आहे. निळाशार समुद्रकिनारा व सफेद वाळू व आजूबाजूच्या परिसरात नारळ, सुपारीची उंच असे वृक्ष यामुळे मुरुडला पर्यटकांची मोठी पसंती आहे. येथे येणारे पर्यटक हे ठाणे-मुंबई परिसरातील जास्त आहेत. यामुळे शहरी जेवणास कंटाळलेले हे पर्यटक गावठी जेवणाला पसंती देत आहेत. यामुळे मुरुडमधील महिलांना तांदळाच्या भाकरीतून रोजगार उपलब्ध झाला आहे.
मुंबईपासून अवघ्या १६० किलोमीटर अंतरावर मुरुड आहे. येथे समुद्रकिनारी सुरूची वने त्यामुळे समुद्राचे आकर्षण सर्व पर्यटकांना आहे. येणारे पर्यटक हे गावठी जेवणाची मागणी करत असून चपातीपेक्षा भाकरीला पसंती देत आहेत. यामुळे काही हॉटेल्स मालकांनी महिलांना तांदळाची भाकरी बनून देण्याचे काम दिले आहे, यामुळे मुरुड शहरातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. एक भाकरी दहा रुपयांप्रमाणे विकली जाते. त्यामुळे येथील महिलांना जास्त आॅर्डर मिळाल्यामुळे मोठा रोजगार घरबसल्या मिळत आहे. याचा कुटुंबाला मोठा आधार होत आहे.
भाकरी बनवण्यास वेळ आणि मेहनत लागत असल्याने बहुतांशी हॉटेलमालक महिलांना ही थेट आॅर्डर देतात. त्यामुळे त्यांना तातडीने ग्राहकांची पूर्तता करता येत आहे. भाकऱ्यांची आॅर्डर मिळाल्याने महिलांना मोठा स्वयंरोजगार मिळून आर्थिक साहाय्य मिळत आहे.
>भाकरीला मागणी
तांदळाच्या भाकरीची मागणी मुरूडमध्ये वाढत आहे. यावरून पर्यटक ग्रामीण भागाकडे तसेच येथील आहाराकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
या भाकरीच्या माध्यमातून महिलाही घरबसल्या संसाराला हातभार लावत आहेत.