महिलांनी जमिनी घेतल्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:42 PM2019-03-08T23:42:06+5:302019-03-08T23:42:08+5:30
तालुक्यातील खातविरा, मेढेखार व कातळपाडा या तीन गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी स्वील लिमिटेड या कंपनीस कारखाना उभारण्यासाठी दिल्या होत्या.
जयंत धुळप
अलिबाग : तालुक्यातील खातविरा, मेढेखार व कातळपाडा या तीन गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी स्वील लिमिटेड या कंपनीस कारखाना उभारण्यासाठी दिल्या होत्या. गेल्या २६ वर्षांत कारखाना उभारण्यात आला नाही आणि नोकऱ्याही दिल्या नाहीत म्हणून शासनाच्याच नियम आणि धोरणास अनुसरून शुक्रवारी या गावांतील महिला शेतकरी व ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वातून ‘आम्ही होत आहोत पुन्हा शेतकरी’असा नारा देत शेतजमिनी पुन्हा ताब्यात घेऊन अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.
स्वील लिमिटेड कंपनीने आपल्या कारखान्याच्या उभारणीकरिता गेल्या २६ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडून या जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र, गेल्या २६ वर्षांत कंपनीने या जमिनीचा औद्योगिक वापर सुरू न करता कारखान्याची उभारणीही केली नाही. कारखाना उभारलाच नसल्याने कारखान्यात शेतकºयांच्या कुटुंबातील कोणालाही नोकरी मिळाली नाही. परिणामी, पिकती भातशेतीही गेली आणि नोकरीही नाही, यामुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती या शेतकरी कुटुंबांवर आली. या समस्येतून मार्ग काढण्याकरिता गेली दहा वर्षे सनदशीर मार्गाने तसेच शांततेने रायगड जिल्हा प्रशासनाकडे हे शेतकरी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून अर्ज, निवेदने, धरणे, मोर्चांद्वारे दाद मागत होते; परंतु शासनस्तरावर कोणत्याही प्रकारे दाद मिळत नव्हती. अखेर या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याकरिता शुक्रवारी जागतिक महिला दिनी मनीषा अशोक म्हात्रे, यमुना कैलास पाटील, भारती हिराचंद्र पाटील, चंद्रकला नामदेव जुईकर, शारदा नारायण पाटील, रंजना एकनाथ जुईकर, इंदिरा काशिनाथ पाटील या महिलांनी पुढाकार घेऊन अन्य ग्रामस्थ शेतजमिनी ताब्यात घेतल्या आहेत.
>२६ वर्षे औद्योगिक वापर झाला नाही : जमीन खरेदी दिनांकापासून १५ वर्षे जर औद्योगिक वापर झाला नाही, तर त्या जमिनी कायद्याप्रमाणे मूळ मालकास परत देण्याची जबाबदारी शासनाची आहे. प्रत्यक्षात २६ वर्षे औद्यागिक वापर झाला नाही, त्यामुळे आमच्या जगण्याचा हक्क आम्ही गमावून बसलो आहोत. आमच्या पुढील पिढीस प्रगती करता येत नाही. या पूर्वी मूळमालकास कायद्यानुसार जमिनी परत देण्यासाठी २६ सप्टेंबर २०१८ रोजी रायगड जिल्हा प्रशासनास श्रमिक मुक्ती दलाने तीन महिन्यांची मुदत दिली होती. पाच महिन्यांनंतरही कोणतीही कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. परिणामी, खातविरा, मेढेखार व कातळपाडा येथील शेतकरी महिला शुक्रवार, ८ मार्च जागतिक महिला दिनी ताब्यात घेणार असल्याबाबतचे लेखीपत्र १ मार्च रोजी रायगड जिल्हा प्रशासनास देण्यात आले होते, अशी माहिती या महिला शेतकºयांनी दिली आहे.
>शेतकºयांचे नुकसान
खातविरा, मेढेखार व कातळपाडा येथील शेतकºयांना नोकरी मिळेल, अशी शाश्वती स्वील लि. कंपनीने दिल्यामुळे, आपल्या जमिनी शेतकºयांनी कंपनीस सन १९९२ मध्ये विक्री केल्या होत्या; परंतु १९९२ सालापासून आजपर्यंत तेथे जमिनीचा वापर औद्योगिक कामासाठी केला नाही. तसेच ठरल्याप्रमाणे प्रकल्पदेखील उभारला नाही, शेतकरी ना नोकरी ना शेती, अशा अवस्थेत गेली २६ वर्षे हलाखीचे जीवन जगत आहेत. नोकरी न मिळाल्यामुळे प्रत्येक शेतकºयांस दरवर्षी एक लाख २० हजार रुपये इतके नुकसान झाले.