सासू टोमणे मारत असल्याने तिने वास्तुशांतीच्या जेवणात कालवलं विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:40 PM2018-06-22T20:40:10+5:302018-06-22T20:40:18+5:30
प्रज्ञाचे पहिले लग्न झाले होते. ते शिंदे कुटूंबामुळे मोडले व सोडचिठ्ठी घ्यावी लागली होती.
खालापूर: महड येथील वास्तुशांती कार्यक्रमाच्या अन्नातून विषबाधा प्रकरणी पोलीसानी प्रज्ञा( उर्फ ज्योती) सुरेश सुरवशे(वय30) या महिलेला पोलिसांनी अटक केली. कौटूंबीक वादातून माने व शिंदे व सुरवशे यांचे संपूर्ण कूटूंब संपविण्याच्या द्वेषापोटी हे कृत्य केल्याची कबुली तिने दिल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी 18जून रोजी महड येथे सुभाष माने यांच्या घरी वास्तुशांती कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 80 जणांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. दुर्देवाने ऊपचारापूर्वीच कल्याणी प्रकाश शिंगुडे (वय-7 वर्ष) ऋषिकेश शिंदे (वय-12 वर्ष ) व प्रगती शिंदे (वय 13 वर्ष) तीन मुलांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी ऊपचार सुरू असताना विजय शिंदे (11) व गोपीनाथ नकुरे(वय54) आणखी दोघांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी पहिल्या दिवसापासून या घटनेला गांभीर्याने घेत तपास सुरू केला होता. रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगडचे जमील शेख, खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्वजीत कांईगडे, महिला पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे, सपोनी शेलार यांनी तपास मोहीम राबवित सुरवातीला तीन संशयिताना ताब्यात घेतले होते. तब्बल चार दिवसाच्या चौकशीनंतर सुभाष माने यांची नातेवाईक प्रज्ञा हिनेच डाळीत विष टाकल्याची कबुली दिली. सुभाष माने, सुरवशे तसेच मयत मुलातील शिंदे कुटूंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. प्रज्ञाची सासू सिंधू सुरवशे तसेच सुभाष माने यांची पत्नी सरिता प्रज्ञाला नेहमी तू काळी आहेस, जेवण बनवता येत नाही म्हणून टोमणे मारून अपमान करत असे. तसेच तिच्या नणंद असलेल्या मयत (मुलांच्या आई)उज्वला व अलका यांदेखील त्रास देत असल्यामुळे हे कुटूंब संपविण्यासाठी डाळीत विष टाकल्याची कबुली प्रज्ञाने दिली. पोलिसांनी प्रज्ञावर मनुष्यवध तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भासे, ठाकूर, सहा.फौजदार पवार, पोलीस नाईक प्रशांत म्हाञे, गबाळे, शेडगे,कोकाटे, कोकरे , महिला पोलीस नाईक खैर, पोलीस शिपाई समीर पवार, तांदळे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पञकार परिषदेत सांगितले.
ज्यांच्यावर राग होता ते सुभाष माने,सासू सिंधू सुरवशे, नणंद उज्वला कदम व अलका शिंदे या लवकर जेवल्यामुळे प्रज्ञाला त्यांना मारण्याची संधी मिळाली नाही. परंतु शिंदे कुटूंबातील मुलं जेवायला आल्यावर तिने वरणाच्या बादलीत फोरेट विषारी द्रव्य टाकले. त्यामुळे या मुलांना अन्नातून विषबाधा झाली. प्रज्ञाचे पहिले लग्न झाले होते. ते शिंदे कुटूंबामुळे मोडले व सोडचिठ्ठी घ्यावी लागली होती. त्यामुळे पुन्हा आपला संसार मोडेल, या भीतीपोटी तिने सासू सिंधु, सुभाष माने व त्याची पत्नी सरिता तसेच नणंद शिंदे व कदम कुटूंब संपविण्याचा अघोरी निर्णय घेतला व त्यातून विषबाधा प्रकरण घडले.