पेण : मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पेणमध्ये पालिका मैदानावर महिला पतंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली चार वर्षे साजरा करण्यासाठी पेणमधील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांचा पुढाकार राहिला आहे. या पतंगोत्सवाचे उद्घाटन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. महत्त्वाची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
महिला अत्याचार विरोधी मंच तर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव या महिला संघटनावर आहे. नई उमंग बेटी के संग, मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाव बेटी पढाव, या महिला धोरणाचा पाठपुरावा सुरू करणारी संस्था आहे. मंगळवारी महात्मा गांधी वाचनालयापासून पेण शहरात दुपारी २ वाजता विद्यार्थिनींची पतंगोत्सवाची माहिती व जनजागृतीसाठी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पेण नगरपालिकेच्या मैदानावर या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव महिलांवर असून आज सर्व क्षेत्रांत महिला आघाडीवर व प्रावीण्य संपादन करीत आहेत. नव्या युगात आज आपण सर्व मिळून आकाशात पतंगाप्रमाणे उंच भरारी घेत आपले करिअर घडवावे, असे सांगितले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी प्रारंभी पतंग उडविला अणि उद्घाटन केले. त्यानंतर पतंग उडविण्यासाठी उपस्थित महिला, विद्यार्थिनींची एकच लगबग सुरू झाली.