कर्जत : १८९ कर्जत विधासभा मतदारसंघात दोन लाख ८२ हजार २४७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर सुमारे ३९ हजार २५६ नवमतदारांची नोंदणी मागील पाच वर्षांत झाली आहे. २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली.
कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात पूर्वी म्हणजे २०१४ रोजी दोन लाख ४२ हजार ९९१ मतदार संख्या होती. यावर्षी वाढून दोन लाख ८२ हजार २४७ झाली आहे, म्हणजेच ३९ हजार २५६ मतदारांची वाढ झाली आहे. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ४,७०९ ने जास्त आहे.
कर्जत विधानसभा मतदारसंघात ३२६ मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये कर्जत तालुक्यात २०६ तर खालापूर तालुक्यात १२० मतदान केंद्र आहेत, कर्जत तालुक्यातील तुंगी, पेठ, कळकराई ही तीन मतदान केंद्र अतिदुर्गम भागातील मतदान केंद्र आहेत. ढाक येथे असलेले मतदान केंद्र वदप येथील संजयनगर अंगणवाडी येथे ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी ४३ एसटी बसेस, आठ मिनी बस, ७७ जीप, दोन ट्रक अशा १३० गाड्यांची व्यवस्था कर्मचारी व मतदान मशिन ये-जा करण्यासाठी केली आहे. कर्जत तालुक्यातील किरवली येथील साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय येथे मतपेटी सुरक्षा कक्ष (स्ट्रॉग रूम) बनविण्यात आले आहे.