अभय पाटील
बोर्ली पंचतन : बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाणे येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी येथील मोहनलाल सोनी विद्यालयातील इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या शुभांगी उत्तम कांबळे या मुलीला एक दिवसासाठी आपल्या पदाचा पदभार देत स्त्रीशक्तीचा गौरव केला. तर भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे मत तिने व्यक्त केले.
महेंद्र शेलार यांच्या कल्पकतेतून महिला सशक्तीकरणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर, बोर्ली पंचतन सरपंच नम्रता गाणेकर, दिवेआगर सरपंच उदय बापट, महमद मेमन, शिवसेना उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर, महिला दक्षता समिती सदस्या हेमलता रेळेकर, माजी सरपंच निवास गाणेकर उपस्थित होते. अशा उपक्रमांतून महिलांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळणे, समाज आणि पोलीस यातील नाते दृढ होण्यास मदत होत असल्याचे विचार शेलार यांनी व्यक्त केले.आज महिला सप्ताहानिमित्त दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने पदभार सांभाळण्याचा बहुमान दिला. हा बहुमान माझा एकटीचा नसून समस्त महिलांचाच आहे. या उपक्रमामुळे तरुणींना शिकण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळेल. भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे.- शुभांगी कांबळे, विद्यार्थिनी