हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण; श्रीवर्धनमधील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:09 AM2020-05-03T01:09:01+5:302020-05-03T01:09:13+5:30

कोंढेपंचतनमध्ये कोरोनाबरोबरच पाणीटंचाईचे रौद्र रूप

Women's demand for potable water; Status in Shrivardhan | हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण; श्रीवर्धनमधील स्थिती

हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण; श्रीवर्धनमधील स्थिती

Next

दिघी : मायबाप, सरकार आता तरी पाणी द्या, अशी डोळ्यात पाणी आणणारी विनवणी येथील वृद्ध महिलांकडून केली जात आहे. श्रीवर्धनमध्ये कोरोना संकटाबरोबर पाणीटंचाईचे संकटही रौद्ररुप धारण करीत आहे. एप्रिलच्या मध्यातच पाणी टंचाई भेडसावू लागल्याने कोंढेपंचतन गवळवाडी येथे हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतमध्ये कोंढेपंचतन या गावाचा समावेश आहे. तीनशेहून अधिक लोकसंख्या असणाºया गावात पाणीटंचाई समस्या दरवर्षी कायमची बनली आहे. विशेष म्हणजे याच गावाच्या नावाने कोंढे धरण उशाला आहे. तरी ग्रामस्थांचा घसा मात्र पाण्याविना कोरडा आहे.

कोंढेपंचतन वरचीवाडी (गवळवाडी) येथे भीषण पाणीटंचाई सुरू असून पुढील दोन महिने पाण्यावाचून कसे काढायचे, असा प्रश्न लोकांना पडला आहे. गावात कुठेही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने दीड-दोन मैल पायपीट करत डोंगर-कपारातून खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी आणत आहेत.

तालुक्यातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी प्रशासनाकडून अंदाजे एप्रिलमध्ये पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो. व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी दिले जाते. मात्र यंदा वारंवार मागणी करूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरीही बंद आहे. एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे पाण्यासाठी वणवण अशा दुहेरी संकटाचा सामना ग्रामस्थ करीत आहेत.

कोंढेपंचतन वरचीवाडी या गावाचा टँकर मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविला असून त्याला मंजुरी मिळताच गावात टँकर सुरू केले जाईल. - डी.डी. रहाटे, ग्रामसेवक, कोंढेपंचतन

गावात कोणतीच पाणीपुरवठा योजना नाही. गावात विहिरी व बोअरवेल नाही. कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनानी लवकरच उपाययोजना करावी. - अशोक दिवेकर, ग्रामस्थ

Web Title: Women's demand for potable water; Status in Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.