अलिबाग - रायगड जिल्ह्यामध्ये घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यावर भर दिला जात आहे. अनेक गावे, वाड्यांमध्ये घराच्या बाजूला परसबागेच्या माध्यमातून भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. त्यामुळे परसबागेचा वाढत क्रेझ यातून दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. नियमीत लागणारे भाजीपाला, बाजारातून खरेदी करणेदेखील अडचणीचे झाले होते. त्यामुळे अनेक गावांतील महिलांनी घरच्या घरी भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वांगी, भेंडीसारख्या अनेक भाज्या घरच्या घरी मिळत असल्याने त्या खर्चात बचत होऊ लागली. गेल्या तीन वर्षात झालेल्या या बदलाचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे.
पावसाळा संपल्यावर अनेक महिला परसबागेच्या माध्यमातून भाजीपाला लागवड करीत आहेत. गावांमध्ये घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्याची लागवडदेखील केली जात आहे. यातून घरच्या घरी भाजीपाला मिळत असून विक्रीतून रोजगाराचे साधनदेखील खुले होऊ लागले आहे. दिवसाला एक हजारहून अधिक रुपये मिळत असल्याने घर खर्च चालविणे सोपे होऊ लागले आहे.
जिल्ह्यामध्ये परसबागेच्या माध्यमातून फावळ्या वेळेत गावांतील महिला दुधी भोपळा, कारले, वांगी, मिरची, कोथींबिर, भेंडी सारख्या अनेक भाज्यांची लागवड करत आहेत. सकाळी पाणी घालणे, गवत काढणे अशा अनेक कामांबरोबरच तयार झालेली भाजी काढून ती स्वयंपाकासाठी वापरणे, तसेच गावात, अथवा बाजारात विक्रीसाठी नेण्याचे काम महिला करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घरातील काम करीत असताना मोकळा वेळ भाजीपाला लागवडीवर दिला. आज यातून विषमुक्त भाजी उपलब्ध होत असून ती बाजारात विक्रीलादेखील नेली जात आहे. यातून रोजगाराचे साधन प्राप्त होत आहे. तसेच, घरच्या घरी ताजी भाजी खाण्याचा आनंदही कुटूंबियांना मिळत आहे.- तेजस्वी सुभाष औचटकर, महिला, शेतकरी