कर्जत : तालुक्यातील बीड गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. रायगड जिल्हा परिषदेने उल्हास नदीवर विहीर खोदली असून या विहिरीतील पाणी गावापर्यंत आणण्यासाठी आमदार निधीमधून १२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता महिलांची पायपीट थांबणार आहे.बीड गावाची लोकसंख्या २००० हून अधिक लोकवस्ती असून हे गाव बोरघाटाच्या पायथ्याशी असल्याने जमिनीतील पाण्याचा साठा लवकर तळ गाठतो. त्यामुळे मार्च महिन्यापासून या भागातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी उल्हास नदीवर जावे लागते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हास नदीमध्ये येथील महिला डवरे खोदून पाणी साठवतात आणि ते पाणी हंड्यात भरून आणतात. ही समस्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सुधाकर घारे यांना २0१७ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यानंतर पाहणी दौऱ्यात जाणवली. त्यांनी जिल्हा परिषदेकडून बीड गावासाठी एक विहीर मंजूर केली आणि उल्हास नदीवर ती विहीर बांधण्यात आली आहे. महिलांना विहिरीतून पाणी उपलब्ध झाल्याने केवळ डवरे खोदण्याचा त्रास वाचला आहे. गावात नळपाणी योजना राबविल्यास गावातील महिलांची पायपीट पूर्णपणे थांबेल.महिलांचा अधिक वेळ पिण्याचे पाणी आणण्यासाठी जात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी तसेच कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रभावती लोभी यांनी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना लक्षात आणून दिली. त्यानंतर लाड यांनी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता डी. आर. कांबळे यांना बोलावून विहिरीतील पाणी गावात येण्यासाठी किती खर्च होईल याचे अंदाजपत्रक बनविण्यास सांगितले. बीड गावात पाइपलाइनने पाणी पोहचविण्यासाठी १२ लाख खर्च येणार असे स्पष्ट करताच आमदार सुरेश लाड यांनी स्थानिक विकास निधीमधील १२ लाख रु पये निधी त्या कामासाठी वर्ग करण्याचे पत्र तत्काळ देऊन बीड गावातील महिलांची पुढील वर्षांपासून पायपीट थांबवावी यासाठी प्रयत्न पूर्ण केले.
महिलांची पायपीट थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:30 AM