अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सभापती पदांसाठी बुधवारी आरक्षण काढण्यात आले. १५ पैकी आठ तालुक्यांवर महिला सभापतींचे वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाची दोरी महिलांच्या हाती आली आहे. पोलादपूर पंचायत समितीवर अनुसूचित जातीची महिला, तर पेण पंचायत समितीवर अनुसूचित जमातीची महिला आणि अलिबाग पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. सकाळी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात १५ तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती कोण विराजमान होणार याबाबतचे आरक्षण काढण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या २१ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आधीच काढण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.अनुसूचित जातीच्या महिलेसाठी पोलादपूर पंचायत समितीचे सभापतीपद आरक्षित झाले आहे. पेण पंचायत समितीवर अनुसूचित जमातीची महिला आणि अलिबाग पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. पनवेल आणि रोहे तालुका नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, उरण आणि सुधागड तालुका नागरिकांचा मागास प्रवर्ग, मुरुड, म्हसळा, खालापूर, आणि श्रीवर्धन सर्वसाधारण महिला, तळा, माणगाव, महाड, कर्जत तालुका पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.अलिबाग तालुक्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा यांची आघाडी आहे. तर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी युती केलेली आहे. अलिबाग तालुक्याचे पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. तालुक्यातील बेलोशी आणि रामराज गण हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या मतदार संघातून निवडून येणारा उमेदवार हा पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान होणार आहे.बेलोशी गणातून काँग्रेसने ताई गडकर यांना तर शेकापने भागी शिद आणि गौरी सोनार यांना उमेदवारी दिली आहे. १३ फेब्रुवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्या वेळी शिद अथवा सोनार यांच्यापैकी एकाला अर्ज मागे घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
ग्रामीण विकासाची दोरी महिलांच्या हाती
By admin | Published: February 09, 2017 4:50 AM