महिलांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:24 AM2019-02-19T03:24:39+5:302019-02-19T03:24:57+5:30
खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
मोहोपाडा : एकीकडे खालापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होण्याच्या मार्गावर असताना मात्र खालापूर शहरातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे.
खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येथील महिलांना काही अंतर पायपीट करून विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. यावेळी रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. डोक्यावर भरलेल्या पाण्याचे हंडे घेऊन महिलांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यावेळी रस्ता ओलांडत असताना अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. काही वर्षापूर्वीच ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. निवडणुकीअगोदर सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने देखील पाण्यात गेल्यासारखी नागरिकांना वाटू लागली आहेत. शहरातील नागरिक आजही या गंभीर समस्येला सामोरे जाताना दिसत आहेत. महिलांना यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागत असून याकरिता खालापूर नगरपंचायतीने महिलांसमोर असणारी पाण्याची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे.