माथेरान : दरवर्षी माथेरानमध्ये अतिवृष्टीमुळे असंख्य जुनाट झाडे मुळासह उन्मळून पडत असतात. विविध पॉइंट्सकडील जंगलात अशा प्रकारे झाडांचा खच पडलेला आहे. परंतु यांचा वापर केला जात नसल्याने ही पडलेली झाडे पावसाळ्यात कुजत आहेत. हे मोठमोठे लाकडाचे ओंडके बाजूला करण्यासाठी तसेच येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने लाकडाचा डेपो सुरू करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. यामुळे या लॉकडाउनच्या काळात स्थानिकांना रोजगार मिळेत आणि कुटुंबातील सदस्यांना हातभार लागू शकेल, असे जाणकार नागरिकांचे मत आहे.पावसाळ्यात, वादळ-वाऱ्यामुळे कोसळलेल्या मोठमोठ्या झाडांच्या ओंडक्यांची जवळपास एक महिनाभर वाहतूक केली जाऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या झाडांचा साठा जंगलात आहे. वेळप्रसंगी येथील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा तुटवडा जाणवतो. यासाठी काही स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्मशानात लाकडाचे डेपो तयार केले आहेत. सध्या येथेसुद्धा लॉकडाउनमुळे तरुणांच्या हाताला काम नाही. अनेक जण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अतिकष्टादायक हातगाडी ओढण्याची कामे नाइलाजास्तव करत आहेत. त्यातच काम करू इच्छिणाºया तरुणांना नगर परिषदेने लाकडांची वाहतूक करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिल्यास अनेक कुटुंबांतील सदस्यांना एक प्रकारे या आणीबाणीच्या काळात आधार निर्माण होऊ शकतो. सध्या दस्तुरीपासून डबरची वाहतूक हातगाडीवर करण्यासाठी जवळपास शंभरपेक्षाही अधिक तरुण कामे करत आहेत. अद्याप अनेकांच्या हाताला काम नसल्याने घरात बसून आहेत. कोरोनाच्या संकटकाळात जर येथील स्थानिक तरुणांच्या हाताला नगर परिषदेने काम दिल्यास सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्यांना पुढील काळात अडचणीवर मात करता येऊ शकते.पडलेली सुकी लाकडे उचलण्याचा व डेपो करण्याचा अधिकार वन खात्याला नाही. ती आहे तेथेच जंगलात व इतर ठिकाणी ठेवायची आहेत असा सुधारित वन कायदा आहे; परंतु नागरी वस्तीतील अडथळा निर्माण करणारी पडलेली लाकडे नगर परिषदेमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत उचलू शकतो.- योगेश जाधव,अध्यक्ष वनसंरक्षक समिती, माथेरान
माथेरानमध्ये लाकडाचा डेपो सुरू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:59 PM