महाड : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाच्या वादातून गुरुवारी सकाळी दोन्ही प्राचार्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही प्राचार्यांसह सहा जण जखमी झाले असून, महाविद्यालयामध्येही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
२०१४ सालापासून आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्यपदावरून वाद सुरू आहेत. २०१४मध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांना निलंबित केले होते. आपले निलंबन बेकायदा असल्याचा दावा गुरव यांनी केला आणि पुन्हा प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली; त्यांच्या निलंबनानंतर याच महाविद्यालयातील ग्रंथपाल सुरेश आठवले यांची प्रभारी प्राचार्यपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर वारंवार आठवले हे आपणच अधिकृत प्राचार्य असल्याचा दावा करीत, डॉ. गुरव कार्यालयात नसले, बाहेरगावी गेले की, प्राचार्यपदाचा ताबा घेत असत. यापूर्वीही अनेक वेळेस असे प्रकार घडले आहेत. गेल्या शुक्रवारीही डॉ. धनाजी गुरव हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत आठवले यांनी प्राचार्यांच्या दालनाचे कुलूप फोडून प्राचार्यपदाचा ताबा घेतला.
गुरुवारी सकाळी ७ वाजता गुरव महाविद्यालयात आपल्या समर्थकांसह घुसले आणि त्यांनी प्राचार्य दालनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या वेळेस दोन्ही प्राचार्यांच्या समर्थकांमध्ये लाठ्या-काठ्या, हातोडे यांच्या साहाय्याने तुंबळ हाणामारी झाली. महाविद्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. या हाणामारीत डॉ. धनाजी गुरव, सुरेश आठवले यांच्यासह महेंद्र घारे, अरविंद साळवी, विठ्ठल गायकवाड, संजय हाटे हे सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर महाडमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.यानंतर महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील यांनी पोलीस पथकासह महाविद्यालयात जाऊन काही जणांना ताब्यात घेतले. महाविद्यालय परिसरात पुन्हा असे प्रकार होऊ नयेत म्हणून महाविद्यालयाशी संबंध नसलेल्यांना महाविद्यालयात जाण्यास मज्जाव केला आहे. तर, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि महाविद्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे.फिर्याद दाखल करण्यास विलंबमहाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद हा फार पूर्वीपासून असून, फिर्यादी जखमी असल्याने फिर्याद दाखल करण्यास विलंब होत आहे. संबंधितांकडून फिर्याद दाखल न झाल्यास पोलिसांमार्फ त फिर्याद दाखल करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्याकरिता सुज्ञ नागरिकांनी या प्रकरणी योग्य ती भूमिका घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.- अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक , रायगडघटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाकडी दांडके, लोखंडी रॉड हस्तगत केले असून, या राड्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, फर्निचर तसे खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली आहे. या घटनेत जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.-अरविंद पाटील,महाड उपविभागीय पोलीस अधिकारी