मुरुड : राज्यभर शासन जलयुक्त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून बंद पडल्याने, धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहाणे क्रमप्राप्त झाले आहे.अंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून, २०१५ पासून बंद ठेवण्यात आल्याने, अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. खारअंबोली धरणाची पाणी साठवणूक क्षमता प्रचंड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळणार आहे.अंबोली धरणाचा शुभारंभ सन २००९ मध्ये पूर्ण झाले, त्यासाठी शासनाचे सुमारे २९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पीक घेऊन ते पाणी पिण्यासाठी देण्याचे हे प्रयोजन होते. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवन वाहिनी ठरली असून, मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. संपूर्ण मुरुड शहरालाही हेच धरण पाणी पाजत आहे.आंबोली धरण उजव्यातीर कालव्याचे काम ७.१० किमीपैकी ६.१० किमी अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ किमीपैकी १.६४ किमी काम अपूर्ण आहे. अल्पभूधारक शेतकरी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना जोडधंदा मिळेल. त्यातून रोजगार मिळावा, अशी त्यांची धारणा आहे.नवीन शासन धोरणानुसार कालवे उघडे न ठेवता बंदिस्त असावेत. त्यानुसार, एस्टिमेट तयार करणे, त्यास प्रशासकीय मंजुरी घेणे या बाबी आहेत. गेल्या अनेक वर्षे आंबोली धरणातील कालव्यांची कामे रखडली असल्याने, येथील स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. फक्त भातपीक घेऊन समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या व अन्य तत्सम पीक न घेतल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. ते पूर्वीप्रमाणे आहेत, त्याच स्थितीत आहेत. कालव्यांचे काम प्रदीर्घ काळ रखडल्यामुळे येथील स्थानिक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
राज्य शासनाकडून निधी प्राप्त करू- महेंद्र दळवी आमदार महेंद्र दळवी यांनी, आंबोली धरणातील कालव्यांची कामे रखडली, ही वस्तुस्थिती असून, मी या प्रश्नी स्वतः विशेष लक्ष घालणार असून, शासन पातळीवर कालव्यांची कामे कशी जलद गतीने करता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाचे बरीचशी रक्कम खर्च होत आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्यावर विविध प्रश्नांसाठी निधी प्राप्त होणार आहे. थोडा वेळ जरी लागत असला, तरी आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त करून घेऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आंबोली धरणाच्या पाण्याचा उपयोग हा सध्या पिण्यासाठीच होत आहे. एकूण पाण्यापैकी १५ टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. बाकी सर्व पाणी धरणातच साचले जाते. डावा तीर कालवा तेलवडेपर्यंत जावा व उजवा तीर कालवा खोकरीपर्यंत गेल्यास शेतकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा होऊन दुबार पीक घेता येणार आहे. तरी कालव्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.- मनोज कमाने, शेतकरी