लेखापरीक्षण समितीचे काम फक्त कागदावरच, खासगी रुग्णालयांकडून हाेणारी लूट थांबण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 06:47 PM2020-09-21T18:47:07+5:302020-09-21T18:47:24+5:30
जिल्हा प्रशासनाने तातडीने यातून ताेडगा काढून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी जाेर धरत आहे.
रायगड : काेराेना रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी सरकारने लेखापरीक्षण समिती गठीत केली आहे. मात्र या समितीच्या माध्यमातून कामच हाेत नसल्याने ती निव्वळ कागदावरच असल्याच्या तक्रारी हाेत आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने यातून ताेडगा काढून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी जाेर धरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून काेराेना संसर्गाचा आकडा सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला महापालिकेनंतर नगर पालिका क्षेत्रात काेराेनाचा प्रादुर्भाव दिसत हाेता आता मात्र काेराेनाच्या संसर्गाने ग्रामिण भागालाही आपले लक्ष्य केले आहे. वाढत्या रुग्ण संख्येसमाेर रुग्णालयातील बेड कमी पडत आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव काहींना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. खासगी रुग्णालयांनी काेराेना रुग्णांवर उपचार करण्यास तयारी दर्शवली. परंतु लाखाे रुपयांची बिलं संबंधित रुग्णांना देण्यास सुरुवात केली. अशा अव्वाच्या सव्वा बिलांमुळे काही रुग्णांचे आर्थिक कंबरडेच माे़डले आहे. सर्वसामान्य रुग्ण तर अशा महागड्या उपाचारांपासून चार हात दूर राहणेच पसंत करत आहेत. परंतु सरकारी रुग्णालयातील साेयी सुविधांचा दर्जा पाहता आपले सर्वस्व विकून तर काही वस्तू गहाण टाकून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास जात असल्याचे चित्र आहे.
खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी शेवटी सरकारला हस्तक्षेप करावा लागला. सरकारने 21 मे राेजी सरकारी निर्णय काढून अशा खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी नियमावली तयार केली तसेच लेखापरीक्षण समिती गठीत केली.
सरकारने आदेश देऊनही काही रुग्णालयांची मनमानी सुरूच आहे. यासाठी नेमलेली लेखापरीक्षण समिती संबंधित रुग्णालयांशी संगनमत करून कारवाईचा आव आणत असल्याबाबतची तक्रार पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी रायगडच्या जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सदरची समिती नुसती कागदावरच कार्यरत असल्याने त्याचा सर्वसामान्यांना काहीच उपयाेग हाेत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
रुग्णांची हाेणारी लूट थांबवण्यासाठी समितीला गती द्यावी अथवा समितीवर सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी पनवेल महापालिका आयुक्तांना सहकार्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे खाेपाेली येथील खासगी रुग्णालयाबाबतची तक्रार आली हाेती. त्यांना विचारणा करण्यात आल्यावर बिलांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. पनवेल महापालिका आयुक्त संबंधित विभागातील खासगी रुग्णालयांच्या बाबतीमध्ये लक्ष देत आहेत, असे माेगम उत्तर जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी लाेकमतला दिले. कांतीलाल कडूंसारखे काही सामाजिक कार्यकर्ते पाेटतिडकीने रुग्णांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळप्रसंगी त्यांचे खासगी रुग्णालय व्यवस्थापनाबराेबर वादही हाेत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन याबाबत किती गंभीर आहे. हे त्यांच्या अनुकरनावरुन दिसून येते.