निधीअभावी रखडली कालव्याची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:25 AM2020-02-24T00:25:07+5:302020-02-24T00:25:12+5:30
हेटवणे सिंचनासाठी भरीव निधी अपेक्षित; महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाबाबत शेतकरी आशावादी
- दत्ता म्हात्रे
पेण : राज्यात सत्तेवर आलेल्या काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारकडून विधिमंडळात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांना मोठ्या अपेक्षा आहेत. पेणमधील हेटवणे धरणाचे सिंचनाचे आरक्षित ८० दशलक्ष घनमीटर पाणी शेतीला मिळावे, निधीअभावी रखडलेली कालव्याची कामे मार्गी लागून येथील ६६६८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यावे, शेतीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून शेती आणि बेरोजगारीला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, हेटवणे धरणात शेती सिंचनाचे पाणी गेली पंधरा वर्षे पडून आहे, हे पाणी शेतीसाठी मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हवामान बदलामुळे पावसावर पीकणारी जिरायती शेती बेभरवशाची झाली आहे. पेणमधील हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या ओलिताखाली ५२ महसुली गावांमधील तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावरील शेतीला सिंचनाचे पाणी मिळाल्यास व पेणचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, मात्र निधीअभावी कालव्याची कामे रखडली असून आता आलेल्या महाविकास आघाडीचे सरकारने हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या सिंचनाचा नियोजन आराखडा मंजूर करून निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
पेणमध्ये हेटवणे मध्यम प्रकल्पात सिंचनाचे ८० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. निधीअभावी कालव्याची कामे रखडली आहेत. येथील ५२ गावांतील खातेदार शेतकऱ्यांचा सातबारा उतारा व महसूल नोंदही झाली आहे.
२००५ या वर्षात पेण मध्ये मुंबई एसईझेड प्रकल्प आला होता. त्या वेळी शेतकºयांनी मोठे जनआंदोलन उभे करून या शेतजमिनी हेटवणे प्रकल्प सिंचनाच्या लाभक्षेत्रातील असल्याने विकासकाला माघार घ्यावी लागली होती. आता दीड दशकभरात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. शेतकरी व त्यांच्या जमिनी जागच्या जागी आहेत. उणीव आहे ती ओलिताखालील जे क्षेत्र महसुली नोंदीत समावेश केला आहे, त्या क्षेत्राला सिंचनाचे पाणी मिळावे. हेटवणे धरण ते शहापाडा धरणाजवळ काश्मिरे गावाच्या वेशीवर कालवा येऊन ठेपला आहे. या कालवा परिसरातील १९ किलोमीटर क्षेत्रातील १७०० एकर भातशेतीला सिंचनाचे पाणी रब्बी हंगामासाठी मिळत असल्याने येथील शेतकरी सधन झाला आहे. कालवा विभागातील उर्वरित उजव्या व डाव्या कालव्याची कामे करण्यासाठी मोठमोठे सिमेंटचे पाइप २००८ पासून जागोजागी ठेवण्यात आले आहेत. या जागेचे भाडेसुद्धा संबंधित शेतकºयांना जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात येते. पाण्याची वितरण प्रणाली जमिनीखालील नलिका वितरण प्रणाली असल्याने शेतकरी व जलसंपदा विभाग यांच्या सहमतीने हे काम सुलभतेने करता येईल. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून सिंचनाचे पाणी व रखडलेली कालव्याची कामे यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकºयांकडून मागणी जोर धरत आहे.
शेतीसाठी तरतूद हवी
नवे सरकार शेतकºयांसाठी सर्वार्थाने काम करणारे आहे. हा विश्वास शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाल्याने हेटवणे सिंचनाचे पाणी शेतीसाठी मिळाल्यास पेण तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. जिरायती शेती सिंचनामुळे बागायती होऊन वर्षाकाठी शेतकºयांना शेतीविषयक व शेतीपूरक उद्योग-धंदे करण्यासाठी चालना मिळेल, अशी अपेक्षा पेणमधील शेतकरी वर्गाकडून महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पातून केली जात आहे.